पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किनी टोलनाक्याजवळ मध्यरात्री एका खासगी बसवर दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. या दरोड्यात 60 किलो चांदी आणि सोने लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विक्रांत कदम याच्यासह सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भररस्त्यात कोयत्याचा धाक
न्यू अंगडिया सर्व्हिस कंपनीचे कर्मचारी मच्छिद्र बाबुराव बोबडे हे कोल्हापुरातून सोने-चांदीचे पार्सल घेऊन सोमवारी मध्यरात्री खासगी बसने मुंबईला निघाले होते. बस किनी टोलनाक्याजवळ पोहोचली असता, प्रवासी म्हणून बसलेल्या एका दरोडेखोराने अचानक वाहकाच्या गळ्याला कोयता लावला आणि चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले.
(नक्की वाचा- Fast Food Habit: फास्ट फूडने घेतला जीव! आतड्याला छिद्र पडलं, 11 वीच्या विद्यार्थिनीचा तडफडून मृत्यू)
सव्वा कोटींचा मुद्देमाल लंपास
बस थांबताच मागून एका कारमधून आलेल्या इतर साथीदारांनी बसच्या डिकीतील पार्सलवर डल्ला मारला. यामध्ये 60 किलो चांदी, 1 तोळा सोने, रोख रक्कम असा एकूण सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर कारमधून पसार झाले.
पोलिसांची गरुडझेप आणि CCTV चा सुगावा
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयास्पद कारचा माग लागला. या आधारे पोलिसांनी विक्रमनगर भागातील विक्रांत कदम याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या सहा साथीदारांच्या मदतीने हा दरोडा घातल्याची कबुली दिली.
(नक्की वाचा- पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)
गुन्ह्यामागचे कारण
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मुख्य आरोपी विक्रांत कदम हा कर्जबाजारी झाला होता. स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी आणि महागड्या चैनी पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने हा दरोडा आखला होता. विशेष म्हणजे, अंगडिया कंपनीचे पार्सल कोणत्या बसमधून आणि कधी जाते, याची रेकी या टोळीने आधीच केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world