- भिवंडीत साकिब अन्सारी नावाच्या तरुणाने दुचाकीवरून जिवंत साप गळ्यात गुंडाळून स्टंट केला
- या स्टंटमुळे नागरिक घाबरले आणि रस्त्यावर मोठ्या संख्येने लोकांनी हा थरार पाहण्यासाठी गर्दी केली होती
- साप विषारी आहे की नाही याबाबत अद्याप माहिती नाही, पण हा प्रकार सार्वजनिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो
भूपेंद्र आंबवणे
सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजीचे नवनवे प्रकार भिवंडीत समोर येत आहे. त्यात आता आणखी एका स्टंटने भिवंडीकरांची झोप उडवली आहे. एका तरुणाने चक्क जिवंत साप गळ्यात गुंडाळून दुचाकी वरून फेरफटका मारत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व जण हादरले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरत आहे. तरुणाच्या या बेजबाबदार कृत्यामुळे भिवंडीत संताप व्यक्त केला जात आहे. त्या तरुणाची ओळख ही पटली आहे. साकिब अन्सारी असं या तरुणाचे नाव आहे. त्याने गळ्यात साप टाकून दुचाकीवरून रपेट मारली. याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
हा व्हिडीओ भिवंडीतला असल्याचं स्पष्ट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकिब अन्सारी असे या तरुणाचे नाव आहे. तो निजामपूर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की साकिबने आपल्या गळ्यात एक मोठा जिवंत साप गुंडाळला आहे. तो एका दुचाकीवर बसला आहे. याच अवस्थेत तो शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवरून दुचाकी चालवत होता. हा थरार पाहण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांची पाचावर धारण बसली होती. अनेक जण हे दृष्य पाहून घाबरले. काहींना तर धडकीच भरली.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हा साप हा विषारी होता की बिनविषारी, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, भररस्त्यात असा प्रकार करणे केवळ स्वतःसाठीच नाही, तर इतर वाहनचालकांसाठीही धोकादायक ठरू शकले असते. जर या सापाने कोणाला दंश केला असता किंवा भीतीपोटी कोणाचा अपघात झाला असता, तर याला जबाबदार कोण, असा रोखठोक सवाल पर्यावरणप्रेमी आणि नागरिक विचारत आहेत. या व्हिडीओनंतर त्या तरुणाला शोधून काढावा. त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही केली जात आहे.
पोलीस कारवाईकडे लक्ष
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांचा जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी या तरुणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस आता या व्हिडिओची सत्यता पडताळून साकिब अन्सारीवर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अशा स्थितीत स्टंट करण्याची तरुणींची कृती धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी विरारमध्ये ही एका तरुणाने गळ्यात जिवंत साप टाकून स्टंट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मात्र तो साप चावला होता. ही बातमी ताजी असतानाच ही घटना समोर आली आहे.