- महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान वाढणार आहे
- अकोला आणि नंदुरबारमध्ये तापमान पारा पन्नेच्यापेक्षा जास्त वाढून उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे
- दुपारी बारापासून चार वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाकडून आणि तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे
महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहेत. आता त्यात पुढील 3 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांत तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गरज नसेल तर घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उष्माघाताचा धोका वाढला
वाढत्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताच्या (Sunstroke) रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पुणे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. पुढील 5 दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नसल्यामुळे तापमानात घट होण्याची चिन्हे नाहीत. यामुळेच अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल. तसा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या सूर्य आग ओकत आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले असून, पुढील 3 दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यातील तापमानाचा पारा उच्चांकी पातळी गाठणार असून मराठवाड्यात उन्हाच्या तीव्र लाटा जाणवतील.
अकोला-नंदुरबारमध्ये विक्रम
राज्यात सध्या सर्वाधिक तापमान अकोला आणि नंदुरबारमध्ये नोंदवले जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांनी 45 अंशांची ओलांडलेली मर्यादा पाहता तिथे 'रेड' किंवा 'ऑरेंज' अलर्ट सारखी स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश शहरांमध्ये दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग देखील सज्ज झाला आहे. सध्या तरी पावसाचे कोणतेही संकेत नाहीत. पुढील 5 दिवस कोरडे हवामान राहणार असल्याने उकाडा अधिकच वाढणार आहे. नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी टोपी, रुमाल आणि छत्रीचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world