- छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी सायकलवरून ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला आहे
- मोदींच्या ऊर्जा बचतीच्या आवाहनानुसार त्यांनी स्वतःसह सर्व कर्मचाऱ्यांना सायकल वापरण्यास प्रोत्साहित केले
- सिंह यांच्या या कृतीमुळे ऊर्जा संवर्धन ही सामाजिक जबाबदारी असून पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाची आहे
मनिष रक्षमवार
प्रशासकीय अधिकारी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था. मात्र, छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. येथील पोलीस अधीक्षक (SP) धर्मेंद्र सिंह यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी चक्क सायकलवरून ऑफिस गाठले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांनी हे पाऊल उचललं असून सध्या सोशल मीडियावर या 'सायकलस्वारी'ची जोरदार चर्चा सुरू आहे. मोदी यांनी नुकताच देशवासीयांना इंधन बचत करावी असा सल्ला दिला होता.
पंतप्रधानांच्या आवाहनातून घेतली प्रेरणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी छोटे बदल करण्याचे आवाहन केले होते. याच विचारातून प्रेरणा घेत पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी आपल्या दिनचर्येत बदल केला आहे. त्यांनी केवळ स्वतः सायकलचा वापर केला नाही, तर आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही ऊर्जा बचतीच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "प्रशासकीय स्तरावर घेतलेला छोटा निर्णय समाजासाठी मोठी प्रेरणा ठरू शकतो," असे सिंह यावेळी म्हणाले.
ऊर्जा संवर्धन ही सामाजिक जबाबदारी
यावेळी बोलताना सिंह यांनी स्पष्ट केले की, वाढत्या प्रदूषणाच्या काळात ऊर्जा संवर्धन ही केवळ गरज नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनात अनावश्यक वाहनांचा वापर टाळून पायी चालणे किंवा सायकल वापरल्यास इंधनाची मोठी बचत होऊ शकते. यातून पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, शिवाय आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या कृतीचं कौतूक होत आहे. त्याच बरोबर त्यांचा सायकलवरून ऑफीसला येण्याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे.
आठवड्यातून एक दिवस 'नो व्हेईकल'
धर्मेंद्र सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात पायी किंवा सायकलने येण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जे कर्मचारी कार्यालयाच्या जवळ राहतात, त्यांनी पायी चालण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे पोलीस दलात आणि सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. मात्र त्यांनी केलेल्या या आवाहानाली किती अधिकारी प्रतिसाद देतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world