अमजद खान, प्रतिनिधी
Dombivli News : डोंबिवलीत सायबर गुन्हेगारांनी ‘महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार' असे सांगत एका कपडे व्यापाऱ्याची तब्बल १४ लाख ४६ हजार ९८९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अरुण भगवान मोरे असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात कुटुंबासह राहतात. मोरे हे कपड्यांच्या विक्रीसह पेंटिंग आणि चायनीज पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात.
बँक माहिती दिली नाही तरीही पैसे गायब...
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला महानगर गॅस कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं. आपल्या परिसरात नवीन गॅस लाईन टाकण्यात येणार असून त्यासाठी सध्याचे कनेक्शन बंद होणार आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून १२ रुपये पाठवा, असे त्याने सांगितलं. मोरे यांना संशय आल्याने त्यांनी कोणतीही बँक माहिती दिली नाही. पुन्हा संपर्क करू नका, अन्यथा पोलिसांत तक्रार करीन, अशी तंबीही त्यांनी कथित गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिली होती. मात्र त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. वेगवेगळ्या आठ व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून १४ लाख ४६ हजार ९८९ रुपये काढून घेण्यात आल्याचे समोर आले.
गॅस कनेक्शनच्या नावाखाली यापूर्वीही मोठी फसवणूक...
आपण कोणताही व्यवहार केला नसतानाही इतकी मोठी रक्कम खात्यातून वळती झाल्याने मोरे यांना मोठा धक्का बसला. दरम्यान याआधी डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या दोन महिलांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली होती. एका ४५ वर्षीय महिलेला “गॅस कनेक्शन बंद होईल” अशी भीती दाखवत १० रुपयांचे ई-चलन भरण्याची लिंक पाठवण्यात आली होती. त्या लिंकवर क्लिक करताच तिच्या खात्यातून २ लाख ९९ हजार ५०० रुपये काढून घेण्यात आले. तर दुसऱ्या ५६ वर्षीय महिलेला APK लिंक पाठवून बँक माहिती उकळत जवळपास १ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. अवघ्या दोन दिवसांत या दोन्ही महिलांकडून सुमारे ४ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संबंधित महिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात, तर व्यापारी अरुण मोरे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमेरिका–इराण तणावामुळे गॅस टंचाईच्या चर्चांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असं असताना सायबर भामटे त्याचाच फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फोन कॉल, लिंक किंवा मेसेज आल्यास सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.