चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ; जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल देखील पाण्याखाली

पंढरपुरची भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी, पंढरपूर 

पंढरपुरची भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणातून प्रवाहित करण्यात आलेल्या पाणी पातळीमुळे पंढरपुरात आता भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. 

उजनी धरणातून सध्या एक लाख 25 हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीत प्रवाहित होतोय. तर वीरधरण्यातून दोन दिवसांपूर्वी 60000 क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीच्या माध्यमातून पुढे भीमा नदीत प्रवाहित झाला. त्यामुळे सध्या पंढरपुरच्या भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. भीमा अर्थात चंद्रभागेच्या वाळवंटात असणारे भक्त पुंडलिकासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिलाय. पंढरपूर आणि सोलापूर रस्त्याला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल देखील पाण्याखाली गेलाय. त्याशिवाय नदीवरील आठ बंधारे आणि एक पूल सध्या उजनीच्या पाण्याखाली गेलेत. पंढरपुरात भीमा नदी इशारा पातळीवरून वाहते आहे. 

नक्की वाचा - पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर

भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. साडेचारशे लोकांचे स्थलांतर झाले आहे. तर पंढरपूर तालुक्यातील 20 गावांना या वाढत्या पाणी पातळीचा फटका बसत आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीत पाणी पातळीत वाढ झाल्याने पंढरपुरात होणारा नौकाविहार बंद करण्यात आलाय. नदीचे पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

मात्र प्रशासनाने बॅरीगेट्स करून नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. सध्या पंढरपुरच्या पात्रात एक लाख 17 हजार क्युसेक इतका विसर्ग आहे. तर उद्या सकाळपर्यंत एक लाख 77 हजार इतका विसर्ग अजून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभरात दीड ते दोन मीटरने पाणी पातळी वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते.

Advertisement