Mumbai News : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत NCL व EWS प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ही प्रमाणपत्रे उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना पोहोच पावती किंवा हमीपत्राच्या आधारे प्रवेश देऊन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू असून सध्या पहिल्या नियमित फेरीतील प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान एनसीएल व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांकडे संबंधित प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मुदत तथा पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत विद्यार्थी, पालक व विविध संघटनांकडून विनंती करण्यात आली होती.
NCL व EWS प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र नसल्यास काय करावं?
या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अद्याप प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची पोहोच पावती अथवा हमीपत्र घेऊन त्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांचे केवळ प्रमाणपत्र प्रलंबित असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यामुळे प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत अधीनस्थ सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत एनसीएल व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world