मुंबई किनारी रस्ता म्हणजे कोस्टल रोड वेसावे ते भाईंदर प्रकल्प अंतर्गत कांदळवन वळतीकरण प्रस्तावास (Forest Diversion Proposal) केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व वातावरणीय बदल मंत्रालय (MoEF&CC) यांच्याकडून तत्वत: मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन व पूर्तता करण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी तसेच वन हस्तांतरण प्रस्तावास तत्त्वतः मान्यता प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीस अंतिम मान्यता मिळविण्यासाठी महानगरपालिका आता उच्च न्यायालयाकडे अर्ज करणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुंबई किनारी रस्ता वेसावे ते भाईंदर प्रकल्प कामाकाजाचा आज महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. यावेळी बांगर म्हणाले की, मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने मुंबई किनारी मार्ग हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. सुगम आणि अखंड प्रवासाच्या उद्देशाने हा प्रकल्प मार्ग बनवला जात आहे. संपूर्ण मुंबईचा किनारीपट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे.
मुंबईच्या दक्षिण पट्टयामध्ये नरिमन पॉंईंट ते वांद्रे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. उत्तर किनारपट्टीमध्ये वांद्रे ते वेसावे दरम्यानच्या किनारी मार्गाचे काम प्रगतिपथावर असून ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत केले जात आहे. तर, वेसावे ते भाईंदर किनारी रस्ता प्रकल्पाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे नरिमन पॉंईंट ते भाईंदर प्रवास विनासायास, सिग्नलरहित होणार आहे. त्याचबरोबर पश्चिम उपनगरातील आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे.
प्रस्तावित मुंबई किनारी मार्ग हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे 60 किलोमीटरचा आहे. नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी व नागरी नियोजन क्षमतेचे ते प्रतीक ठरणार आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे वेसावे ते भाईंदर किनारी मार्गाने जोडले जाणार आहे. त्यामुळे वेसावे ते भाईंदर प्रवासाचा कालावधी 90 ते 120 मिनिटांवरून केवळ 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे. इंधन बचतीमुळे पर्यावरणीय कार्बन उत्सर्जनात सुमारे 55 टक्के घट होईल. या प्रकल्पात उन्नत मार्ग, पूल आणि दोन बोगदे यांचा समावेश असेल. रस्ता व बोगदा बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. हा मार्ग वेसावे रस्ता, मालाड, मालवणी, कांदिवली, बोरिवली आणि शेवटी दहिसर पुढे मीरा मार्गे भाईंदरपर्यंत जाईल. हा प्रकल्प ऑगस्ट -2025 मध्ये सुरु करण्याचे आणि डिसेंबर -2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.