
Maharashtra Assembly Session 2025: महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अधिकारी त्यावेळी उपस्थित नसतात, या मुद्द्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभेत 293 च्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. त्यावेळी संबंधीत खात्याचे मंत्री विधानसभेत हजर नव्हते. शिवाय अधिकारीही त्यावेळी उपस्थित नव्हते. यावर भाजप आमदार सुधिर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना बांधू आणा असा संताप व्यक्त केला. त्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी ही पाठिंबा दिला. त्यामुळे थोडा वेळासाठी विधानसभेतील वातावरण तापलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
293 च्या माध्यमातून महत्वाच्या विषयांवर चर्चा होत असते. ही चर्चा राज्याच्या हिताची असते. त्यासाठी आमदार तयारी करून येता. काही प्रश्न मांडतात. त्याची दखल कुणीतरी घेणं गरजेचं असतं. मंत्री कामात व्यस्त असू शकतात हे समजू शकतो. मात्र विभागाचा एकही सचिव चर्चेला बसू राहू शकत नाही ? असा प्रश्न या निमित्ताने सुधिर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. 95 पासून आपण आमदार आहे. तेव्हापासून सचिव महत्त्वाच्या चर्चेला बसायचे. पण सध्या ती स्थिती नाही. त्यामुळे तालिका अध्यक्ष असलेल्या चेतन तुपे यांच्याकडे मुनगंटीवार यांनी एक मागणी केली. सचिव बसत नसतील तर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये सचिवांना बांधून आणले जात होते. तसं काही करता येतं का ते पाहावे. तसे निर्देश तुम्ही द्या आणि तुमचे नाव सुवर्णाक्षरात लिहून घ्या, पुन्हा ही संधी येणार नाही असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
मुनगंटीवार यांनी सचिव बसत नसल्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुनगंटीवार यांच्या वक्तव्याला पाठिंबा देवू केला. राज्याच्या विकासाच्या व्हीजन संदर्भात चर्चा करण्यासाठी 293 ची चर्चा लावण्यात आली आहे. मी 40 वर्षापासून विधानसभेचा सदस्य आहे. पूर्वी अधिकाऱ्यांना बसायला जागा नसायची. अशा प्रकारची उदासीनता असेल तर राज्यातील प्रश्न मार्गी कसे लागतील? मी सुधीर मुनगंटीवारांच्या प्रस्तावाला पाठींबा देतो. त्यांनी जे उदाहरण दिलं तसं बांधून आणता येत असेल तर तसं बघा काही करता येतं का? असं खोतकर म्हणाले.
यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून चेतन तुपे हे काम पाहात होते. विषयाचे आणि सदस्यांनी मांडलेल्या मुद्दांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने कारवाई करावी असे निर्देश तुपे यांनी यावेळी दिले. शिवाय बऱ्याचदा टीव्हीवर कामकाज पाहीले जाते. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर जातात. अशा वेळी गरज पडल्यास टीव्ही बंद करावेत. तसं करता येतं का ते पाहावे. तसं झाल्यास सगळ्यांना विधानसभेत येण्याची सवय लागेल असं तुपे यांनी सांगितले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच अधिकारी येत नाहीत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या आधी असं कधीच होत नव्हतं. उलट अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसायला जागा नसायची असं सांगत काँग्रेस काळाची आठवण तर करू दिली नाही ना अशी चर्चा विधानभवनात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world