शपथविधीच्या दुसऱ्याचा दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा; आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांची मालमत्ता मुक्त

पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

महायुती सरकारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या बेहिशेबी मालमत्ता लवादने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची मालमत्ता सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तिकर विभागाने अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची मालमत्ता जप्त केली होती. विभागाने 7 ऑक्टोबर 2021 रोजी विविध कंपन्यांवर छापे टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती. ही कागदपत्रे अजित कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीची असल्याचा दावा त्यांनी केला.

बेनामी प्रतिबंध अपीलीय न्यायाधिकरणाने हे आरोप फेटाळले. यानंतर आयकर विभागाने न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, ते न्यायाधिकरणाने फेटाळले होते. 2021 मध्ये मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

अजित पवारांना आयकर विभागाकडून दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आयकर विभागाने जप्त केलेली अजितदादांची मालमत्ता सही सलामत परत केली. लोकशाही बळकट करण्यासाठी दादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता."

Advertisement