बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणचा सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. एका भेटीसाठी त्याचे फॅन्स दूरवरुन येत आहेत. त्याच्या घरी त्याच्या फॅन्सची रीघ लागली आहे. अशातच सूरज चव्हाणने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी सूरजचा सत्कार करत त्याचं स्वागत केलं. अजित पवार यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सूरज चव्हाण सोबत बऱ्याच गप्पा मारल्या.
सूरज चव्हाणला गावी एक घर बांधायचं आहे, हे त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे. बिग बॉसच्या घरात असाताना देखील त्याने हे बोलून दाखवलं होतं. हीच गोष्ट लक्षात ठेवून अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्याच शब्द दिला आहे. अजित पवार यांनी केवळ शब्द दिला नाहीतर आपल्या कामच्या शैलीनुसार तिथूनच फोनाफोनी करत घर बांधण्यासाठीच्या हालचाली देखील सुरु केल्या आहे.
ह्युंडाई कंपनीकडूनही गिफ्ट
सूरज चव्हाणला याआधीच घरात लागणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याला ह्युंडाई कंपनीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मोठा एलसीडी टीव्ही, याचा समावेश आहे. या सर्व वस्तू त्याच्या नव्या घरात ह्युंडाई कंपनी तर्फे देण्यात येणार आहेत. तळागाळातले तरूण आपल्या मेहनतीने पुढे येतात. राज्यात देशात आपली छाप पाडतात अशा तरूणांना ह्युंडाई कंपनी प्रोत्साहन देत असते. दरवर्षी अशा तरूणांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांना हे बक्षिस दिले जाते. यावेळी कंपनीने सूरज चव्हाणची निवड केली आहे. त्याला आता या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट दिल्या जाणार आहेत.
बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणने किती पैसे कमावले?
सूरज चव्हाण याला ट्रॉफीसह 14.50 लाख रुपये मिळाले. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाखांचं ज्वेलरी वाऊचरही मिळाले होते. सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठी सीजन 5 मधून एकूण 24.6 लाख रुपये मिळाले. तर कोई मोई डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, त्याला दर आठवड्याला 25 हजार रुपये मिळाले होते. अंतिम आठवड्यापर्यंत त्याची एकूण किंमत 2.5 लाखांपर्यंत जाते.