पालघर लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे. 'NDTV मराठी'च्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. महायुतीमधील पालघर आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप कायम आहे. पालघरमध्ये सध्या शिवसेनेचे राजेंद्र गावित सध्या खासदार आहेत. पण, ही जागा आता भाजपा लढवणार असल्याचं फडणवीस यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये जाहीर केलंय. आज किंवा उद्या पालघरचा उमेदवार जाहीर होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले फडणवीस?
आम्हाला मिळालेल्या जागापैकी पालघर घोषित करायची आहे. शिवसेनेला मिळालेल्या जागेपैकी ठाणे आणि नाशिक बाकी आहे. पालघरच्या जागेवरील उमदेवाराची आज किंवा उद्या घोषणा होईल, असं फडणवीस यांनी जाहीर केलं.
आम्हाला ठाणे आणि दक्षिण मुंबई या जागा हव्या होत्या. आमच्या कार्यकर्त्यांचा त्यासाठी आग्रह होता. या जागा वर्षानुवर्ष आमच्या राहिल्या आहेत, अशी त्यांची भूमिका होती. आमचाही काही युक्तीवाद होता. सर्व युक्तीवाद झाल्यानंतर अंतिम जो निर्णय झाला त्याला आम्ही बांधील आहोत, त्यामध्ये कुणाची मनधरणी करण्याचा प्रकार घडला नाही. आम्ही बैठका बऱ्यापैकी केल्या, दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाले पण, निर्णय एकमतानं झाला असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजपानं मुंबईतच नाही तर बाहेरच्या जागांवरचेही उमेदवार बदलले आहेत. सात-आठ मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत. त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेत असतो. अनेकवेळा लोकसभा लढणाऱ्या उमेदवाराला आम्ही विधानसभा लढा म्हणतो. विधानसभा लढणाऱ्यांना लोकसभा लढा म्हणतो. ही पक्षाची पद्धत आहे. आम्ही ज्यांना वगळलं त्यांनी चुकीचं काम केलं असं मी म्हणणार नाही. त्यांनी चांगलं काम केलं. पण, प्रत्येक निवडणुकीत परिस्थिती वेगळी असते. वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळी कोण उमेदवार योग्य असेल याचा विचार आम्हाला करावा लागतो. तो विचार करुन आम्ही उमेदवारी देतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.