जाहिरात

'पायी वारी हातात तुतारी'; हर्षवर्धन पाटलांचं पाऊल कोणत्या दिशेने?

हर्षवर्धन पाटलांनी आता अपक्ष मैदानात उतरावं, अशी पाटलांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. 

'पायी वारी हातात तुतारी'; हर्षवर्धन पाटलांचं पाऊल कोणत्या दिशेने?
इंदापूर:

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज (10 जुलै ) (BJP leader Harshvardhan Patil)  तुकोबांच्या पालखीत पायी चालत सहभागी झाले होते. हर्षवर्धन पाटील तसे दरवर्षीच वारीमध्ये पायी चालतात. मात्र यंदा हर्षवर्धन पाटलांच्या पायी वारीमध्ये छोटा ट्विस्ट आलाय. पायी चालता चालता हर्षवर्धन पाटलांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बोलावलं. त्याला तुतारी वाजवायला लावली आणि त्याच्याबरोबर फोटोसेशनही केलं. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. 'रामकृष्ण हरी... आता वाजवा तुतारी'. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.  हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यातच हर्षवर्धन पाटील यांना तुतारीसोबत फोटोसेशन करताना पाहून राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे पायी चालत जात असताना पालखी सोहळ्यातील तुतारी वाजवणारा माणसाला बरोबर घेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फोटोसेशन केलं. हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर या तुतारीच्या माणसाने तुतारी देखील वाजवली. निमगांवचा मुक्काम आटोपून हा सोहळा इंदापूरकडे येत असताना हा सर्व प्रकार घडला. 

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज आहेत का?
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात अजित पवार महायुतीत आल्याने इंदापुरातून कोण लढणार, दत्ता भरणे की हर्षवर्धन पाटील हा मोठा प्रश्न आहे. हर्षवर्धन पाटलांनी आता अपक्ष मैदानात उतरावं, अशी पाटलांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. हर्षवर्धन पाटील मात्र सध्या कुठलेच पत्ते उघडायला तयार नाहीत. महायुतीला यश मिळो, एवढीच प्रार्थना सध्या हर्षवर्धन पाटील विठ्ठलाकडे करत असतील असं म्हटलं जात आहे. 

नक्की वाचा - विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका

हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणूनच राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.  अपक्ष आमदार असूनही हर्षवर्धन पाटलांना कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतची पदं मिळाली. 2019 ला भले आघाडी तुटली तरी बेहत्तर पण इंदापूरची जागा सोडणार नाही, अशी गर्जनाच अजित पवारांनी केली होती. आता हेच अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने इंदापूरच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुन्हा इंदापूरच्या जागेवर अजित पवार अडून बसतील आणि सत्ताधारी आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल, असं कार्यकर्त्यांना वाटतंय. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचं विमान आता कुठल्या दिशेनं झेपावणार, हे पुढच्या काही काळातच कळणार आहे.
 

Previous Article
मध्य रेल्वेवर तब्बल 22 तासांचा पॉवर ब्लॉक, अनेक गाड्या रद्द
'पायी वारी हातात तुतारी'; हर्षवर्धन पाटलांचं पाऊल कोणत्या दिशेने?
mumbai-university-senate-elections-to-proceed-as-planned-on-september-22-high-court
Next Article
Mumbai University Senate Election : हायकोर्टाचा विद्यापीठाला दणका, निवडणुकीबाबतचा आदेश रद्द