Pune News: पुणे शहरात 'हिट अँड रन' घटनेने खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला एका कारने जोराची धडक दिली असून, ही धडक 'मुद्दाम' मारल्याचा गंभीर आरोप पूनावाला बंधूंनी केला आहे. शहजाद पूनावाला यांच्या आई या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पूनावाला यांच्या आई त्यांच्या ड्रायव्हर आणि सहाय्यकासोबत बाहेर गेल्या होत्या. गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी त्या एका बाजूला थांबल्या असताना, एका कारने त्यांना जोराची धडक दिली आणि चालक तिथून पळून गेला. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून हा अपघात नसून 'मुद्दाम' केलेला हल्ला असल्याचे पूनावाला कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा- Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)
पूनावाला बंधूंची संतप्त प्रतिक्रिया
शहजाद पूनावाला यांनी 'X' वर पोस्ट करत याबाबत म्हटलं की, "एका अत्यंत नीच प्रवृत्तीच्या माणसाने माझ्या आईला मुद्दाम कारने धडक दिली आणि तो पळून गेला. या वयात त्यांच्यासोबत असे घडल्याने माझे रक्त सळसळत आहे. पुणे पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नराधमाला लवकरात लवकर अटक करावी."
तहसीन पूनावाला याबाबत अधिक माहिती देताना म्हटलं की, "आईवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून तिला आयुष्यभरासाठी रॉड टाकावा लागेल. मी पोलीस सहआयुक्त आणि पोलीस उपायुक्तांशी बोललो आहे. हा हल्ला पूर्वनियोजित वाटत आहे."
(नक्की वाचा- Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
पुणे पोलिसांकडून तपास सुरू
पुणे शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपी कार चालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.