राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा, विजया रहाटकर यांची नियुक्ती

Vijaya Rahatkar : भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले. "सक्षमा" उपक्रमामधून अॅसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins

भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी श्विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा असेल.‌

संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. 1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाची कामगिरी

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले. "सक्षमा" उपक्रमामधून अॅसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचवल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. विजया रहाटकर यांनी डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे "साद" नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले. एका अर्थाने त्यांनी आयोगालाच पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले होते. 

(नक्की वाचा- महायुती सरकारला दणका! निवडणूक आयोगाने 'ते' निर्णय केले रद्द, महामंडळाच्या नियुक्त्यांवरही गाज)

राजकीय प्रवास

महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा विजया रहाटकर यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळवलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 

छत्रपती संभाजी नगरच्या महापौर त्याआधी 2007 ते 2010 या कालावधीत तत्कालीन औरंगाबाद आणि विद्यमान छत्रपती संभाजी नगरच्या महापौर असताना विजया रहाटकर यांनी शहर केंद्रीत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. यात आरोग्य सेवेपासून ते पायाभूत सुविधा निर्मितीपर्यंत अनेक घटकांचा समावेश होता. महापौर पदाच्या काळात विजया रहाटकर महाराष्ट्र मेयर कौन्सिलच्या अध्यक्षा आणि ऑल इंडिया मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षादेखील होत्या. त्या सध्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेच्या सल्लागार संचालिकादेखील आहेत. 

(नक्की वाचा- बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...)

भौतिकशास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजया रहाटकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये 'विधिलिखित' या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन , 'अग्निशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

"राष्ट्रीय महिला आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानते. या महत्वपूर्ण जबाबदारीचे पालन मी निष्ठेने आणि समर्पण भावनेने करेन. शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिक गती देण्याचा प्रयत्न करेन. केवळ महिला सक्षमीकरण एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रेला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील", असं विजया रहाटकर यांनी म्हटलं.