महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अजूनही जागा वाटप निश्चित झाले नाही. अशा वेळी महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी वेगळी वाट धरण्याचे संकेत दिले आहेत. त्यातील एका पक्षाने तर थेट आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसऱ्या मित्र पक्षाने जर जागा सोडली नाही तर आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्या आधिच मविआमध्ये फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीतील समाजवादी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष हे सध्या महाविकास आघाडीत नाराज आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी जागा वाटपाची वाट न पाहात थेट आपला उमेदवार जाहीर केला. त्यांनी मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातून शान -ए-हिंद निहाल अहमद यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मालेगावची जागा महाविकास आघाडीत समाजवादी पार्टीला सोडली गेली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू असताना थेट उमेदवार जाहीर केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय भिवंडीतून रईस शेख यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीने जागा वाटपा आधीच आपला उमेदवार जाहीर केला होता. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षातही नाराजी असल्याचे दिसून येत आहे. सांगोला विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला मिळावा अशी मागणी होत आहे. हा मतदार संघ दिवंगत गणपतराव देशमुख यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. शेकापचा हा गड देशमुखांनी कधी ढासळू दिला नव्हता. मात्र 2019 च्या निवडणुकीत इथून शिवसेनेचे शहाजीबापू निवडून आले आणि शेकापचा गड कोसळला. त्यामुळे या जागेवर सध्या शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
मात्र शेकापने ही जागा आमचीच आहे अशी भूमीका घेतली आहे. तसे न झाल्यास मविआतून बाहेर पडण्याचा इशारा शेकापनं दिला आहे. या मतदार संघातून शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे इच्छुक आहे. 2019 च्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा अगदी थोडक्या मतांनी या मतदार संघातून पराभव झाला होता. तर माजी आमदार दीपक सोळुंखे यांनी ऐन वेळी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र नुकताच दीपक साळुंखे यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सुटणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. दीपक साळुंखे यांनी या मतदार संघात कामाला सुरूवात केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - दाऊदबरोबर संबंध असल्याचा आरोप,नंतर जेलवारी, आता लेकीसह बापालाही उमेदवारी
समाजवादी पार्टीला महाविकास आघाडीत 12 जागा मिळाव्यात अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी केली होती. शिवाय समाजवादी पार्टीच्या हक्कांच्या जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दावा करत असल्याचा आरोपही आझमी यांनी केला होता. जर 12 जागा मिळणार नसतील तर समाजवादी पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्यास तयार असल्याचेही आझमी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अखिलेश यादव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. त्यांनी मालेगावमध्ये सभाही घेतली. शिवाय दोघांच्या उमेदवारीची घोषणा ही केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world