कोरोना काळात मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माण विधानसभेचे भाजपचे आमदार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी संबंधित पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी कोरोना काळात रुग्णांसाठी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी भाजप आमदार गोरे यांनी उकळल्याचा दावा केला होता. त्यांच्याविरोधात कोरोना काळात 35 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कागदोपत्री पुरावा तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता घोटाळा प्रकरणात सहभागी असलेले माण विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडित पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी ओबीसी नेत्यांचा अपमान केला; ओबीसी मेळाव्यात नेत्यांचा हल्लाबोल
हायकोर्टात या प्रकरणात चौकशीची मागणी करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख संस्थेचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून सातारा जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
उच्च न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या महत्वाच्या सूचना…
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या, अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या. आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 35 पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी मायणी येथील दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरेंविरोधात हायकोर्टात याचिका केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून या याचिकेची गंभीर दखल घेण्यात आली होती.
जयकुमार गोरेंच्या अडचणीत होणार वाढ?
जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची या याचिकेतून मागणी करण्यात आली होती. सरकारनं मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालयं आणि कोविड सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा विनामूल्य देण्याकरता पुरवला होता. मात्र आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.