शरद सातपुते, सांगली
ओबीसी मेळाव्याला काँग्रेस नेते येऊ नये म्हणून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटलांनी आडकाठी करत ओबीसी नेत्यांचा पानउतारा केल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. सांगलीच्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून खासदार विशाल पाटलांना चांगलेच खडे बोल सुनावले.
सांगलीमध्ये पार पडलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे येऊ नयेत, यासाठी विशाल पाटलांनी आडकाठी केली. ओबीसी समाजाच्या स्थानिक नेत्यांना मेळावा, रॅली कशासाठी घेताय, अशा शब्दात सुनावल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे.
तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांची ओबीसी मेळाव्यासाठी स्थानिक ओबीसी नेत्यांनी भेट घेतली. विश्वजीत कदमांनी ओबीसी कार्यकर्त्यांचा अपमान करत आरक्षण घेऊन तुम्ही राष्ट्रपती होणार आहात का? असं म्हटलं, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी केला.
दरम्यान छगन भुजबळ यांनी यावरून वसंतदादा पाटील यांचा किस्सा सांगत खासदार विशाल पाटलांना आपल्या वाड-वडिलांची जाण ठेवा. सगळ्यांनी तुम्हाला मते दिली आहेत,आम्ही तुमची खासदारकी मागायला आलो नव्हतो, अशा शब्दात खडेबोल सुनावले.
...तर त्याला अजिबात सोडायचं नाही- भुजबळ
सगळाच मराठा समाज वाईट नाही, पण जो-जो ओबीसी समाजावर उठेल त्याला अजिबात सोडायचं नाही, असं छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात म्हटलं. तसेच राज्यात महायुतीचे सरकार आहे, पण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणासाठी गोरगरीब जनतेची डोकी फुटत असतील, तर आपण शरद पवारच नव्हे तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटायला जाणार. सगळ्याच पक्षांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world