भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रत्यक्ष भेटीगाठी, दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी, युवा सहभाग आणि ज्येष्ठांचा सन्मान यांचा सुरेख संगम साधत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान येथे दर्शन घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली. त्यानंतर 'जननी आशिष' अनाथाश्रम, 'आपलं घर' वृद्धाश्रम आणि 'डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी' या संस्थांना सहकुटुंब भेट देऊन तेथील नागरिक आणि प्रशिक्षणार्थ्यांसोबत वेळ घालवला.
कल्याणकारी उपक्रमांचे वाटप
वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य, विद्यार्थ्यांसाठी सायकली, अपारंपरिक ऊर्जेसाठी सोलार पॅनेल, तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स व हेल्मेट, तसेच वयोवृद्धांना ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप करण्यात आले. राज्यभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय वृद्धाश्रमांमध्ये वॉशिंग मशिन आणि इतर आवश्यक साहित्याची मदत सुपूर्द करण्यात आली.
कल्याण-डोंबिवलीत विविध भाजप कार्यालयांचे उद्घाटन झाले, जिथे Gen Z युवकांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार'च्या स्नेहसंमेलनात आणि मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयांत महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजप परिवारातील पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी हीच जनसेवेच्या कार्यासाठी मला आणखी बळ देणारी आहे, अशी कृतज्ञतापूर्वक प्रतिक्रिया या वेळी रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.