BMC Election 2026: मराठी माणसाच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासाची पाने चाळावीत आणि मगच भाष्य करावे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्या आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे 'पाप' काँग्रेसचेच होते, याची आठवण चव्हाण यांनी करून दिली. या संदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की, ज्या काँग्रेसने मुंबई केंद्रशासित करण्याचा घाट घातला होता, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसताना उबाठा गटाला मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला आहे. (BJP vs Shiv Sena UBT) ही लढाई आता केवळ सत्तेची नसून ती नैतिकतेचीही बनली आहे.
नक्की वाचा: BMC Election : मुंबईत 30,000 रुपयांत मिळतंय भारतीय नागरिकत्व? NDTV च्या रिपोर्टमधून 'मालवणी पॅटर्न'चा खुलासा
ठाकरेंनी हिशोब द्यावा! चव्हाणांचे आव्हान
चव्हाण यांनी विकासाच्या मुद्द्यांवरूनही शिवसेनेला (उबाठा) धारेवर धरले. कोकण रेल्वेचे श्रेय असो किंवा मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास, भाजपने सातत्याने मराठी माणसाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी झालेला पाठपुरावा हा भाजपच्याच प्रयत्नांचे फलित आहे. 30 वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगताना केवळ परप्रांतीय कंत्राटदारांचे भले करणाऱ्यांनी मराठी माणसासाठी नेमके काय केले, याचा हिशोब द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
नक्की वाचा: BMC Election 2026: मुंबईत राडा! 'या' वॉर्डात दोन्ही शिवसेना भिडल्या; ठाकरेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारलं
ठाकरेंनी शिवसेनेची ओळख बदलली
शिवसेनेची “मी मराठी” ही ओळख बदलून “मी मुंबईकर” ही संकल्पना मुंबईतील मराठी माणसाच्या डोक्यावर कोणी लादली ? मुंबईची मराठी ओळख पुसण्याचे पातक "मी मुंबईकर"च्या मोहिमेतून उद्धव ठाकरे यांनीच केले आणि हे बदल बाळासाहेब ठाकरे यांना मान्य होते का? याचं प्रामाणिक उत्तर देखील उद्धव ठाकरे यांनी द्यावं असं आव्हान चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. शिवसेनेची मूळ ओळख बदलून ती केवळ मतांच्या राजकारणापुरती मर्यादित ठेवणे हे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता जनतेनेच या ढोंगी राजकारणाला उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. भाजपचे हिंदुत्व आणि मराठी प्रेम हे केवळ घोषणांपुरते नसून ते कृतीतून सिद्ध झाले आहे, असा दावाही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केला.