Mumbai News: महिलांनो सावधान! BKC मध्ये सुरुये नवा 'स्कॅम'? एक चूक अन् मोठा फटका; पोलीस म्हणाले...

मुंबईतील बीकेसी परिसरात दोनचाकी स्वार कार चालकांना अडवून अपघाताचा खोटा बनाव रचत असून, भरपाई म्हणून ऑनलाईन पैसे उकळत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Crime News: मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, आता याच परिसरात वाहनचालकांना लुटण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली आपबिती शेअर केल्यानंतर, बीकेसी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अनुपमा पटनाईक असं महिलेचं नाव आहे. 

नक्की काय आहे हा 'स्कॅम'?

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार बीकेसीमधील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडत असल्याचे महिलेने सांगितलं.  दुचाकीस्वार अचानक कार समोर येतात आणि कारने आपल्या बाईकला धडक दिली आहे, असा बनाव रचतात. बाईकचे नुकसान झाले आहे असे सांगून हे पोलिसांना न कळवता जागेवरच पैशांची मागणी करतात. विशेष म्हणजे, रोख रक्कम घेण्याऐवजी हे ठग QR कोड दाखवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात, जेणेकरून कारवाई टाळता येईल.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; रूपाली चाकणकरांच्या व्हायरल व्हिडीओ खळबळ, राजकारण पेटलं)

महिलेने ट्वीटमध्ये काय म्हटलं?

अनुपमा पटनाईक यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महिलांनी NMACC पासून BKC परिसरात रात्री गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी. तिथे एक रॅकेट चालू आहे, ज्यात एक बाईकस्वार येऊन तुमच्या गाडीला मागून धडक देतो आणि नंतर QR कोडद्वारे पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अंधार असतो. डॅश कॅम लावा आणि 112 किंवा 100 वर कॉल करा. जेव्हा एखादी महिला पोलीस तिथे असेल तेव्हाच गाडीतून बाहेर पडा."

पोलिसांना काय सांगितलं?

या प्रकरणावर बीकेसी पोलिसांनी म्हटलं की, "आम्ही 'X' वर पोस्ट करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला आहे, परंतु अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. आम्ही तिला पोलीस ठाण्यात बोलावले आहे जेणेकरून इतर कोणासोबतही असे घडू नये. नुकतीच एक घटना घडली होती जिथे कारने अचानक वळण घेतल्याने एक बाईकस्वार पडला होता. त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून ती कायदेशीर केस आहे. मात्र, परिसरात कोणतीही ठग टोळी सक्रिय असल्याचा संशय सध्या तरी आम्हाला नाही."

(नक्की वाचा-  Pune Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा पुण्याला फटका; पेट्रोलच्या दरात मोठी वाढ

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे

परिसरातील एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितले की, "आम्ही सकाळी 10 ते रात्री 2 पर्यंत येथे असतो. पण असा कोणताही प्रकार आमच्या नजरेस पडलेला नाही. कदाचित अंधाराच्या ठिकाणी अशा घटना घडत असाव्यात." मिड डेने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जर कुणी तुम्हाला अडवून अपघाताचा आरोप केला, तर घाबरून पैसे न देता तत्काळ पोलिसांना कळवा. काररमध्ये डॅश कॅम असल्यास अशा खोट्या आरोपांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.