BMC News: बीएमसीचा बिग डे! बुधवारी होणार 4 मोठ्या समित्यांचा फैसला, कोण होणार अध्यक्ष? वाचा संभाव्य दावेदार

BMC Committee Elections 2026: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा आणि पर्यायाने मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार, याचा फैसला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
BMC Committee Elections 2026: या सर्व समित्यांमध्ये भाजपा आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे.
मुंबई:

BMC Committee Elections 2026: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा आणि पर्यायाने मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार, याचा फैसला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह सुधार, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी (18 फेब्रुवारी 2026)  नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे अर्ज सादर करता येतील. 

या सर्व समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे पूर्ण वर्चस्व असल्यामुळे, या चारही महत्त्वाच्या समित्यांवर महायुतीचाच झेंडा फडकेल हे आता निश्चित मानले जात आहे.

कोणती समिती कुणाला मिळणार?

भाजप आणि शिवसेना यांच्यातील ठरलेल्या सूत्रानुसार, सर्वात महत्त्वाची असलेली स्थायी समिती आणि शिक्षण समिती भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिंदे यांच्या शिवसेनेला दिले जाणार असल्याचे समजते. 

सुधार समितीबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी, मंगळवारी (16 फेब्रुवारी) रात्री उशिरापर्यंत यावर शिक्कामोर्तब होईल. या सत्तावाटपात भाजपने आपल्याकडे आर्थिक नाड्या असलेल्या समित्या ठेवण्यावर भर दिला आहे, तर शिवसेनेला परिवहन आणि इतर विभागांत संधी दिली जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli News: 100 कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार? KDMC च्या एका चुकीच्या निर्णयामुळे डोंबिवलीत संतापाची लाट )

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या या स्थायी समिती अध्यक्षांच्या हातात असतात, त्यामुळे या पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या पदासाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश भांदिर्गे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वी गटनेते म्हणून काम केले असून त्यांना स्थायी समितीच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. 

तसेच मकरंद नार्वेकर यांनीही यापूर्वी या समितीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या अनुभवी चेहऱ्यांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीत एकूण 26 सदस्य असून शिक्षण समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्याने ही संख्या 27 वर पोहोचते.

Advertisement

( नक्की वाचा : कोण होता Tipu Sultan? ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत पाळतो सूतक, वाचा हा इतिहास )

शिक्षण समितीत कुणाचे नाव आघाडीवर?

शिक्षण समितीमध्ये एकूण 26 सदस्य आहेत, ज्यामध्ये 22 निवडून आलेले नगरसेवक आणि 4 बिगर पालिका सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांचे नाव आघाडीवर आहे. 

राजश्री शिरवाडकर यापूर्वी महापौर पदाच्या शर्यतीत होत्या, मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांची वर्णी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, शिक्षण समितीचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतो, त्यामुळे शिरवाडकर यांना तिजोरीच्या चाव्या असणाऱ्या समितीतही स्थान मिळणार आहे.

Advertisement

बेस्ट समितीवर शिवसेनेचा दावा

बेस्ट समितीमध्ये एकूण 16 सदस्य संख्या असते आणि स्थायी समिती अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्याने ही संख्या 17 होते. ही समिती शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेकडून या पदासाठी तृष्णा विश्वासराव यांचे नाव चर्चेत आहे. तृष्णा विश्वासराव यांना बेस्ट समितीमधील कामकाजाचा मोठा अनुभव असून त्या सध्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
 

Topics mentioned in this article