ऋतिक गणकवार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुलुंडचा प्रभाग क्रमांक 107 सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा या प्रभागातून बिनविरोध विजय होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने एक डाव टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचा फायदा झाल्याने भाजपचे मुलुंड पश्चिमेतील उमेदवार नील सोमय्या 'बिनविरोध' निवडून येऊ शकतील अशी स्थिती निर्माण झाली होती. नील सोमय्या यांच्यासमोर प्रस्थापित राजकीय पक्षातील एकही उमेदवार उरलेला नव्हता. मात्र एका बंडखोरामुळे त्यामात्र ठाकरे गटाचे शिवसैनिक दिनेश जाधव यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
नक्की वाचा: माजी क्रिकेटपटू केदार जाधव याचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप
संजय राऊत यांचे किरीट सोमय्यांवर आरोप
खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना भाजपवर आणि विशेषतः किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले की, "किरीट सोमय्या हे केवळ आमचे शत्रू नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मराठी भाषेचे द्वेष्टे आहेत. महाराष्ट्राच्या दुश्मनांना जर भाजप निवडणुकीत आणत असेल, तर त्यांचे मनसुबे स्पष्ट आहेत." महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे होती, मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज बाद झाला. यामागे भाजपचा 'बिनविरोध घोटाळा' असल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या हे आपला मुलगा बिनविरोध निवडून येणार म्हणून नाचत होते, पण आमचा कडवट शिवसैनिक दिनेश जाधव तिथे खंबीरपणे उभा आहे," असे राऊत यांनी म्हटले.
नक्की वाचा: भाजप उमेदवारांकडून ओवाळणीतून मतदारांना पैसे वाटप? काँग्रेसच्या आरोपाने खळबळ
'कमळ' विरूद्ध 'दूरदर्शन'
नील सोमय्या यांच्यापुढे प्रमुख राजकीय पक्षांपैकी एकही तगडा उमेदवार उरला नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पाठिंबा दिला आहे. "नील सोमय्या आणि त्यांच्या वडिलांनी अनेकांना धमकावले, अगदी भाजपमधील इच्छुक उमेदवारांनाही गप्प केले. मात्र, मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही," असे जाधव यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला बोलावून अधिकृत पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे आणि केवळ लढण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे. दिनेश जाधव यांच्याकडे पक्षाचे 'मशाल' हे अधिकृत चिन्ह नसले आणि ते 'दूरदर्शन संच' या चिन्हावर लढत असले, तरी शिवसेना ठाकरे गटाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मागे उभी राहिली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे गुजराती असले तरी ते उत्तम मराठी बोलतात, मात्र ते मराठीद्वेष्टे असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. यामुळे मुलुंड पश्चिमेला असलेल्या वॉर्ड क्र.107 मध्ये गुजराती विरूद्ध मराठी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.