BMC Election Result 2026: मुंबईच्या महापौरासाठी भाजप आता 'एकनाथ शिंदें'नाच धक्का देणार? ठाकरेंचे खळबळजनक भाकीत

BMC Election Result 2026: शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
BMC Election Result 2026 : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबाबत नवा दावा केला आहे.
मुंबई:

BMC Election Result 2026:  मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्तेची समीकरणं जुळवण्याला वेग आला आहे. मात्र याच काळात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.  भाजपाने ज्याप्रमाणे आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्री केला, त्याचप्रमाणे आता मुंबईचा महापौर करण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडतील, असे भाकीत उद्धव ठाकरे यांनी वर्तवले आहे. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांनी हा दावा केला आहे.

महापालिकेतील सत्तेचा पेच आणि ठाकरेंचा टोला

मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी 114 हा आकडा आवश्यक आहे. सध्याच्या निकालानुसार महायुतीकडे 117 नगरसेवक आहेत, ज्यात भाजपचे 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. 

या आकड्यांमुळे भाजपचा महापौर बसणे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी त्यासाठी त्यांना शिंदेंच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. माझा पक्ष तोडून त्यांनी आपला मुख्यमंत्री बसवला होता, आता ते शिंदेंचा पक्ष तोडून स्वतःचा महापौर बनवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असे ठाकरे म्हणाले.

( नक्की वाचा : BMC Election 2026 Result : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पराभवाचे राज ठरले व्हिलन! 25 वर्षांचा गड अखेर कोसळला )

आम्ही हरलेलो नाही....

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, आम्ही हरलो आहोत अशी आमची मानसिकता अजिबात नाही, कारण आम्ही या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिले आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, भाजपला आता फोडलेली माणसे टिकवण्याचे मोठे टेन्शन आहे. आमचा आकडा सध्यातरी महापौरांसाठी पुरेसा दिसत नसला, तरी आम्ही खचलेलो नाही. 

Advertisement

आमच्या पराभवाला तेज आहे, तर त्यांचा विजय हा डागाळलेला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. ज्यांच्या मदतीने भाजप महापौर बनवणार आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधील तुमच्या प्रभागात कोण जिंकले? विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर )

सत्ताधारी पक्षावर आरोप

सत्ताधारी पक्षाने ही निवडणूक अत्यंत विचित्र आणि घाणेरड्या पद्धतीने लढवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करून शिवसैनिकांना तडीपार करण्यात आले, तरीही ज्यांनी गुंडागर्दीविरोधात मतदान केले तेच खरे लोकशाहीचे रक्षक आहेत, असे त्यांनी नमूद केले. शिवाजी पार्कवरील सभेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मी आणि राज ठाकरे एकत्र आलो, तेव्हा मैदान पूर्णपणे भरले होते. लोकांची गर्दी आमच्याकडे होती, पण मतदान त्यांच्याकडे झाले, हे एक न उलगडलेले कोडे आहे.

Advertisement

गेल्या चार वर्षांपासून शिवसेना संपवण्याचे षडयंत्र सुरू होते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करण्यात आला, असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर प्रेशर कुकर आणि इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा पैसा नेमका कुठून येतो आणि या मागे ईडी किंवा इनकम टॅक्स विभाग चौकशी का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गद्दार लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा महापौर बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं. 
 

Topics mentioned in this article