- लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता 14 जानेवारीला जमा होणार असल्याची सोशल मीडिया पोस्ट
- 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान
- व्हायरल पोस्टच्या सत्यतेबाबत काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे विचारणा
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मकरसंक्रांत (Makar Sankranti) गोड होणार की नाही, यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 14 जानेवारीला लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट, निवडणूक आयोगाकडे त्यावर घेतलेला आक्षेप यामुळे 14 जानेवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा हफ्ता जमा होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. या बातमीचे सविस्तर फॅक्ट चेक (Fact Check) केले असून वास्तव काय आहे ते समोर आणले आहे.
नक्की वाचा: 'लाडक्या बहिणींना 14 तारखेला 3 हजार मिळणार!', पुण्यात मेसेज व्हायरल; निवडणूक आयोगाने काय म्हटलं?
लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार राज्य सरकार मकर संक्रांतीचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना 3 हजार रुपयांची भेट देणार आहे. 15 जानेवारीला मुंबईत मतदान असून त्याच्या अगदी 1 दिवस आधी दोन महिन्याचा हफ्ता दिला जाणार असल्याचे सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. दोन महिन्यांचा हफ्ता 14 जानेवारीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाण्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करत हा आचारसंहितेचा भंग (Model Code of Conduct) असल्याचे म्हटले आहे. 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठीचे मतदान पार पडणार आहे. त्याच्या एक दिवस आधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे काँग्रेसच्या संदेश कोंडविलकर यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: पुणेकरांसाठी व्हिजन काय? वनराज आंदेकरच्या लेकीने दिलं उत्तर
सत्य नेमके काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार असे समोर आले आहे की, सरकारने अद्याप अधिकृतपणे 14 जानेवारी ही तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, निवडणूक आयोगाने (EC Notice) सोमवारी सकाळी 11:00 वाजेपर्यंत सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. जोपर्यंत आयोगाचा हिरवा कंदील मिळत नाही, तोपर्यंत पैसे जमा होणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे सोशल मिडिया पोस्टवर आंधळा विश्वास ठेवून लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 जानेवारीला येतीलच, असे ठामपणे सांगणे सध्या घाईचे ठरेल.