पावसाळा सुुरु होताच मुंबईत डेंगी आणि हिवतापचे (मलेरिया) रुग्ण वाढतात. या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘भाग मच्छर भाग' ही विशेष जनजागृती मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी मराठी, हिंदी, चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिध्द व्यक्ती देखील मदत करणार आहेत. डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा सेलिब्रिटींमार्फत संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिवताप आणि डेंगी प्रतिबंधासाठी उपाययोजना
1. नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून आल्यास असता तात्काळ निचरा करावा.
2. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्याखालील तबकडी, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.
3. फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलावे.
4. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक (Mosquito Repellent) औषधांचा वापर करावा.
5. जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळावे, अशा अडगळीत पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ शकते.
6. ताप आल्यास जवळच्या बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा व समूळ उपचार पूर्ण करावा.
( नक्की वाचा : मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा )
‘भाग मच्छर भाग'जनजागृती मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हिवताप, डेंगीसारख्या आजारांचे मुंबई महानगरातून निर्मूलन करण्यास मदत करावी असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.