मुंबई महानगरपालिकेचे 'मुंबई अग्निशमन दल' संपूर्ण मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असते. आग लागलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आग शमविणे, अन्य प्रसंगांमध्येही बचाव कार्य करणे यासाठी मुंबई अग्निशमन दल समर्पित भावनेने कार्यरत असते. मुंबईकरांच्या सुरक्षेसह अग्निशमन जवानांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आग शमविणे आणि स्वःरक्षणासाठी जवानांना अद्ययावत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कांदिवली येथे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. हा कार्यक्रम भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात संपन्न झाला.त्यावेळी डॉ. सैनी हे बोलत होते. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, महानगरपालिकेचे उपआयुक्त प्रशांत गायकवाड, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्यासह अग्निशमन दलाचे सेवानिवृत्त अधिकारी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातमी - Big News: मुंबईला दिलासा! टँकर असोसिएशनने संप घेतला मागे, पाणी पुरवठा सुरळीत होणार
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक म्हणाले की, मुंबईत निर्माण होणार्या उंच इमारती, दाटीवाटीच्या वसाहतींमधील अरुंद रस्ते, वाढती लोकसंख्या आणि इतर आव्हानांना तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान सदैव कार्यरत असतात. आग शमवण्याच्या घटनांसह जोरदार पावसामुळे सखल परिसरांमध्ये पूरस्थिती, इमारती कोसळणे व तत्सम आपत्तींमध्ये बचाव कार्य करण्यासाठी देखील अग्निशमन जवानांना वैविध्यपूर्ण प्रशिक्षण दिले पाहिजे, असे वारिक यांनी नमूद केले.
उप आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले की, आग लागलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आग विझवण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा मुंबई अग्निशमन दलात समावेश करण्यावर भर देण्यात येत आहे. या अत्याधुनिक यंत्रणेसह अग्निशमन दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अद्ययावत प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून कांदिवली येथे उभारण्यात येणारे अग्निशमन प्रशिक्षण केंद्र हे देशातील पहिले अद्यावत प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. या केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देखील गायकवाड यांनी दिली.
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी प्रास्ताविक केले. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील 66 अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' पाळला जातो, असे सांगून मुंबई अग्निशमन दलाचे उपक्रम, अग्निरक्षक कार्यक्रम, अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन आदींविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली.