
मुंबई ते गोवा रस्ते प्रवास आता सुसाट होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग हा रखडलेला आहे. देशातील अन्य महामार्ग तयार होवून वाहतूकीसाठी खुले झाले. पण मुंबई गोवा हायवेचे काम मात्र काही केल्या पूर्ण होवू शकलेले नाही. यासाठी अनेक आंदोलनं झाली. पण काम काही पूर्ण झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत हतबलता दाखवली होती. काम पूर्ण होण्याच्या वेगवेगळ्या तारखा ही देण्यात आल्या होत्या. पण आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग कधी पूर्ण होणार याची फायनल तारीख सांगितली आहे. त्यामुले मुंबई गोवा प्रवास सुसाट होण्यास मदत होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणजे मुंबई गोवा हायवेचे काम कधी पूर्ण होणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. याबाबतचा सस्पेन्स केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संपवला आहे. हा महामार्ग करताना अनेक अडचणी आल्या होत्या. तीन एकर जमिनीचे पंधरा पंधरा वारसदार होते. त्यांच्यात एकमत होत नव्हते. त्यामुळे मोबदला देण्यात ही अनेक अडचणी येत होत्या. त् या कारणाने रस्त्याला निश्चितच वेळ लागला आहे. पण आता या अडचणींवर मात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास आता सुसाट होवू शकणार आहे.
मुंबई गोवा महामार्ग जून 2025 पर्यंत पूर्ण होईल असा ठाम विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. हे काम जून अखेरी शंभर टक्के पूर्ण होईल असं त्यांनी ठाम पणे सांगितलं. आपल्या विभागाला दिल्ली ते जयपूर आणि मुंबई ते गोवा हे महामार्ग वेळेत पूर्ण करता आले नाही. तो आमच्यावर लागेला ब्लॅक स्पॉट आहे असं ही ते यावेळी म्हणाले. पण आता अधिव वाट पाहावी लागणार नाही. जून महिन्यात हा रस्ता पूर्ण होणार आहे. दादर येथे झालेल्या वसंत व्याख्यान मालेत त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे कोकणवासीयांचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबईत आणखी एक महत्वाचा रस्ता आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. अटलसेतू मार्ग जेएनपीटीचा रस्ता थेट पुण्यासा जोडला जाणार आहे. त्यानंतर तो पुढे बंगळूरूपर्यंत वाढवला जाईल. हा रस्ता तयार झाल्यानंतर मुंबई बंगळूरू प्रवास पाच तासाचा होईल असं ही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबई ते दिल्ली या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पूर्वी या प्रवासाला 48 तास लागत होते. पण आता नरिमन पाँईट ते दिल्ली प्रवास 12 तासात होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. या रस्त्याचं महाराष्ट्रातलं काम राहीलं आहे. असंही ते म्हणाले. पुढच्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिके पेक्षा ही चांगले असतील असं ही त्यांनी सांगितलं.
दरम्यान नॉर्थ इस्टकडच्या राज्यात जवळपास तीन लाख कोटींचे रस्ते बांधत असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. शिवाय
दिल्ली जयपूर हा प्रवास आता दोन तासाचा झाला आहे. तर दिल्ली डेराडून देखील दोन लागतात. दिल्ली ते कटरा 12 तास लागत होते, तो प्रवास सहा तासावर आला आहे. तर दिल्लीहून श्रीनगरला थेट 8 तासात पोहचता येत आहे असं गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग संदर्भात पुढील पंधरा दिवसात नवीन धोरण आणले जाणार आहे. लोकांची कोणतीही तक्रार राहणार नाही असं धोरण असेल. टोल नाका येथे लोक विरहित काम असेल. सर्व स्वयंचलित टोल नाके चालवण्याची व्यवस्था असेल. जितका प्रवास तितकाच टोल राहील अशी भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world