- महापालिका निवडणुकीत डॉ. सरिता म्हस्के या शिवसेना ठाकरे गटातून विजयी झाल्या होत्या
- निकालानंतर सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्या, ज्यामुळे पक्षात तणाव निर्माण झाला होता
- सरिता म्हस्के यांनी सांगितले की त्या देवदर्शनासाठी तुळजापूरला गेल्या होत्या.
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर सत्तेच्या गणिताची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अनेकांनी नगरसेवकांना अज्ञात ठिकाणी हलवलं. तर काही नगरसेवक हे नॉटरिचेबल झाले. त्यामुळे त्यांच्या पक्षांच्या नेत्याची धावपळ सुरू झाली. माध्यमांना याबाबत स्पष्टीकरण देताना नाकी नऊ आहे. त्या पैकीच एक नगरसेवक म्हणजे डॉ. सरिता म्हस्के. सरिता म्हस्के या शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतून निवडून आल्या आहेत. निकाल लागल्यानंतर त्या नॉट रिचेबल होत्या. ऐन वेळी त्या शिंदे गटातून ठाकरे गटात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याबाबतचा संशय बळावला होता. त्यात आता 24 तासानंतर म्हस्के या समोर आल्या आहेत. शिवाय त्या नॉटरिचेबल का होत्या हे ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय त्यांनी वेगवेगळ्या चर्चांवरही पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. सरिता म्हस्के या गेल्या तीन वर्षापासून शिंदे गटात कार्यरत होत्या. त्यांनी त्यांच्या प्रभागात तयारीही सुरू केली होती. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण ऐन वेळी जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. शेवटच्या क्षणी म्हस्के यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना उमेदवारी ही देण्यात आली. शेवटी त्यांनी विजय मिळवला. पण खरा ट्वीस्ट पुढे आला. निकालानंतर त्या नॉट रिचेबल झाल्या. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे टेन्शन वाढले. नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यासाठी त्या आल्याच नाहीत. त्यामुळे त्या नक्की कुठे गेल्या आहेत हे कुणालाच समजायला मार्ग नव्हता. त्यांचा फोन ही नॉट रिचेबल होता.
अखेर 24 तासानंतर म्हस्के आता समोर आल्या आहेत. त्यांनी सांगितले की मी देवदर्शनाला गेले होते. माझा नवस होता. कोकण भवनला यायचं आहे याचा मेसेज उशीरा आला. त्यामुळे मला कल्पना नव्हती. मी निघून गेले होते. जेव्हा आम्हाला ही बातमी समजली त्यावेळी आम्ही मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात होतो. वरिष्ठांनी आम्हाला आमचे फोन बंद करायला सांगितले होते. तुम्हाला ट्रेस केले जाईल, तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही, तोवर फोन बंद ठेवा असे आदेश होते असं स्पष्टी करण त्यांनी दिलं आहे. आम्ही तुळजापूरला गेले होतो. विरोधक आमच्या मागे असतात म्हणून फोन बंद करायला सांगितल होता. हे सर्व आमच्या सुरक्षेसाठी होतं.
पुढे त्या म्हणाल्या आम्ही मिलींद नार्वेकरांच्या घरी गेलो, तिथेच राहिलो, अजूनही आम्हाला मोबाईल सुरू करण्याची परवानगी नाही, आता मी कोकण भवनमध्ये नोंदणी केली, आता मी संपर्कात असेल असं ही त्या म्हणाल्या. माझं नाव सगळ्या न्यूजमध्ये झळकत होते. त्यामुळे माझी सुरक्षितता महत्वाची होती. म्हणूनच मी नार्वेकरांच्या घरी होते. तुम्ही स्थानिक आमदाराच्या संपर्कात होत्या याबाबत ही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या बिलकुल नाही, आम्ही जिंकून आलो आहोत. त्यामुळे विरोधकांना काहीतरी पाहिजे असते. ते आपलं नाव बदनाम करत आहेत. आपण आता ठाकरे गटात आहोत. आपल्याला कुणीही संपर्क केला नाही किंवा कुणाच्या ही संपर्कात नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.