- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा विजय मिळवला
- भाजप महापौर पिंपरी चिंचवड महापालिकेत बसणार आहे
- महापौरपदासाठी खुल्या वर्गातील महिला व पुरुष नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा आहे
सूरज कसबे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत भाजपने बाजी मारली. अजित पवारांना शह देण्यात भाजपच्या महेश लांडगे यांना यश आलं. या महापालिकेत आता भाजपची एकहाती सत्ता येणार आहे. महापौर हा भाजपचाच होणार हे स्पष्ट झालं आहे. त्यात आता महापौरपदाची सोडत निघाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौर कोण याचा सस्पेन्स वाढला आहे.
महापालिकेत भाजपचे 84 नगरसेवक जिंकून आले आहेत. त्यातील अनेक जण हे खुल्या प्रगर्वातले आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी चुरस वाढली आहे. अनेक जणांनी या पदावर दावा ठोकला आहे. आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती आहे. या स्पर्धेत पुरूष नगरसेवकांबरोबर महिला नगरसेवकांचीही महापौर होण्याची इच्छा आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. संधीचं सोनं करायचं असा त्यांचा मानस आहे. त्यामुळे जोरदार प्रयत्न इच्छुकांनी सुरू केले आहेत.
महापौरपदासाठी सर्वसाधारण खुला गट असं आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे भाजपच्या 84 विजयी नगरसेवकां पैकी महिला किंवा पुरुष नगसेवकाला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सुप्रिया चांदगुडे यांचं नाव आघाडीवर आहेत. त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवाय त्या अभ्यासू म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे संघटन कौशल्य खास आहे. त्याच बरोबर स्नेहा कलाटे याही या पदासाठी इच्छुक आहेत. तरूण आणि उच्च शिक्षित ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांनी ही यापदासाठी फिल्डींग लावल्याचं समजतं.
नक्की वाचा - Mayor Reservation Lottery Live: मुंबई, पुणे,नाशिकचा महापौर खुल्या प्रवर्गाचा होणार
या शिवाय सारिका गायकवाड या ही महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्या सर्वाधिक 16 हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे ही नाव या पदासाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे पुरुष नगरसेवकांपैकी ज्यांना मागील दोन वेळा संधी असूनही महापौरपदी विराजमान होता आलं नव्हत ते भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी यावेळी माघार नाही अशी भूमीका घेतल्याचे समजते. त्यामुळे त्यांचे पारडे ही जड मानले जात आहे. त्यांच्या सोबत रवी लांडगे यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे. ते बिनविरोध निवडून आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world