विशाल पुजारी, मुंबई
Mumbai News : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आल्याने तयारीला आता वेग आला आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन 'एक खिडकी' प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी मिळवण्यासाठी सोमवार, २१ जुलैपासून पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) संगणकीय 'एक खिडकी' अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे मंडळांना स्थानिक पोलिस स्थानक आणि स्थानिक वाहतूक पोलिसांकडून आवश्यक असलेले 'ना-हरकत' प्रमाणपत्र (NOC) देखील सुलभतेने आणि एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे, ज्यामुळे परवानगी प्रक्रियेतील किचकटपणा कमी होईल.
(नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?)
खड्डा विरहित मंडप आणि दंडाची तरतूद
यंदा मंडप उभारणी करताना 'खड्डा विरहित' पद्धतीवर भर देण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. जर मंडप उभारताना खड्डा खणल्याचे आढळून आले, तर संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च आणि प्रति खड्डा विशिष्ट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे. यामुळे रस्त्यांची दुरवस्था टाळता येईल.
महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पर्यावरण विभागाने सण-उत्सवासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पाच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या जारी केलेल्या तत्त्वांनुसार, प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) सह पाच फुटांपर्यंतच्या सर्वच मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होतील.