Mumbai Crime NEws: मुंबईच्या बोरीवली परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोराईच्या मुंबादेवी विद्यानिकेतन शाळेत आयोजित केलेल्या वार्षिक गणित प्राविण्य परीक्षेत दिव्या सराईया नावाच्या कोचिंग क्लासच्या शिक्षिकेने एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला डमी उमेदवार म्हणून बसवल्याचा आरोप आहे.
असा झाला प्रकार उघड
तक्रारदार, मुख्याध्यापिका वृंदा ठाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे असोसिएशन वर्ग 5, 7 आणि 8 साठी वार्षिक गणित प्राविण्य परीक्षा आयोजित करते. 15 डिसेंबर रोजी झालेल्या या परीक्षेला 139 विद्यार्थी बसले होते. परीक्षा सुरू असताना एका पर्यवेक्षकाला त्या विद्यार्थ्यावर संशय आला, कारण तो वारंवार प्रश्नपत्रिका घेऊन वॉशरूममध्ये जात होता.
पर्यवेक्षकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक फोन सापडला. त्यांनी लगेच मुख्याध्यापिका वृंदा ठाकर यांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनची तपासणी केली असता, तो मुलगा प्रश्नपत्रिकेचे फोटो एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवत असल्याचे उघड झाले. विद्यार्थ्याने दावा केला की त्याने ते पेपर त्याच्या बहिणीला पाठवले होते.
(नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पकडल्यानंतरही विद्यार्थ्याने आणि आरोपी शिक्षिकेने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पालकांचे मोबाईल नंबर विचारले असता, विद्यार्थ्याने चुकीचे क्रमांक दिले आणि आपली जन्म तारीख सांगण्यास नकार दिला. तसेच, त्याने आपल्या कोचिंग क्लासचे नाव 'एज्युकेशन हब' हेच शाळेचे नाव म्हणून सांगितले.
मुख्याध्यापिका त्या विद्यार्थ्याला बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. तिथे विद्यार्थ्याने त्याच्या कथित 'आईचा' मोबाईल नंबर दिला. फोन केल्यानंतर दिव्या सराईया तिथे आल्या आणि त्यांनी आपली ओळख विद्यार्थ्याची आई म्हणून दिली. ओळखीच्या पडताळणीसाठी सराईया यांनी स्वतःचे आधार कार्ड दाखवले, पण मुलाचे आधार कार्ड दुसऱ्या दिवशी आणते, कारण घर बंद आहे, असे कारण दिले.
गुन्हा दाखल
अखेरीस मुलाने सत्य सांगितले आणि त्याचे खरे नाव हॉल तिकीटवरील नावापेक्षा वेगळे असल्याचे उघड झाले. तो मालाड येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेत नववीचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी सांगितले की, दिव्या सराईयाने त्याला खोटे नाव वापरून परीक्षेत बसण्याची सूचना दिली होती. गणित आणि इंग्रजी शिकवणाऱ्या सराईया यांची चौकशी करण्यात आली. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना या प्रकाराबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यांचा मुलगा कोचिंगसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता.
बोरीवली पोलिसांनी शिक्षिका दिव्या सराईया यांच्या विरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.