संजय तिवारी, नागपूर
Nagpur News : ब्रेकअपचा सूड घेण्यासाठी तरुणाने तरुणीचं घर पेटवून दिलं आहे. नागपूरच्या कर्नलबाग परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गु्न्हा दाखल करत 27 वर्षीय झीशान निसार खान याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी मुलगी फक्त 13 वर्षांची असताना दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर झीशान याने तिला कथित प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांपूर्वी झीशान तिला मोटरसायकलवर वाठोडा येथे घेऊन गेला होता आणि एका मैदानावर बांधलेल्या बंद खोलीत त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. याच रागातून मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र, झीशान तिला मेसेज करतच होता. त्यानंतर तिने त्याच्याशी बोलणी सुरू करताच तो तिला मनीषनगर येथील एका हॉटेलात घेऊन गेला आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. असे प्रकार वारंवार घडत राहिले, त्याच्या या छळामुळे आणि मारहाणी कंटाळून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले.
त्यानंतर झीशान तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊ लागल्याने तिने नोकरी देखील सोडली. दरम्यान तिच्या आई आणि बहिणीला मारून टाकण्याची धमकी देत तो तिच्यावर अत्याचार करतच राहिला. मात्र जेव्हा त्याने सतत तिचा पाठलाग सुरू केला तेव्हा 23 वर्षीय तरुणीने कंटाळून हा प्रकार आई आणि बहिणीला सांगितला आणि नातेवाईकांकडे वर्ध्याला निघून गेली.
(नक्की वाचा- आता काश्मीरबाबत नाही तर पाकव्याप्त काश्मीरबद्दल चर्चा करू! PM मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे)
झीशानने वर्धा येथील रामनगर परिसरातून काही साथीदारांच्या मदतीने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड केल्याने लोक धावून आले आणि ती बचावली. नुकत्याच 10 मे रोजी तिच्या नागपूर येथील घरी अचानक आग लागली आणि बेडरूम तसेच काही साहित्य जळून खाक झाले. परिसरातील एका तरुणाने तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. यात देखील झीशान याचाच हात असल्याचे समोर येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.