Buldhana Hair Loss : व्हायरसमुळे बुलढाण्यातील गावकऱ्यांना पडतंय टक्कल? केसगळतीत महिलांची संख्या लक्षणीय

या समस्येत आधी डोकं खाजवतं नंतर सरळ केस हाती येऊ लागतात आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास 50 हून अधिक  व्यक्तींना अचानक केसगळती सुरू झाली आहे. काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत सर्वच नागरिक अनभिज्ञ असल्याने गावात खळबळ उडाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या प्रकाराने खळबळ उडाली आहे. काहींनुसार हा व्हायरस आहे, तर काहींनी यामागे पाणी जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. या समस्येत आधी डोकं खाजवतं नंतर सरळ केस हाती येऊ लागतात आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तिन्ही गावातील अनेक व्यक्तीचे केस एकाएकी कमी होऊन गळून जात आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. गावातील सर्वेक्षण झाले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे.  

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Morning Walk vs Evening walk : कोणत्या वेळेस चालणे ठरेल फायदेशीर, सकाळी की संध्याकाळी?

मुंबईच्या कॉस्मेटिक सर्जन डॉ. अपूर्वा सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॅम्पू-कंडिशनर किंवा औषधांमधून ही समस्या उद्भवली नसावी. सामान्य असणाऱ्या गोष्टींमधून याचा प्रसार झाला असावा. पाण्यामध्ये जड धातूंचं प्रमाण वाढून किंवा हवेमधून दूषित घटक वाढल्याने गावकऱ्यांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावं लागत असावं. मात्र घाबरून जाऊ नका. नको ते मेडिकेशन करू नका. आरोग्य विभागाकडून यासंदर्भात तपास सुरू आहे. त्यांच्या  तपासणीनंतर उपचार करावा.

साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही यासंदर्भात  कळवण्यात आलं आहे. या आजारामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत. काही डॉक्टर म्हणतात शॅम्पूमळे हा प्रकार घडत असावा, मात्र कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेत या गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर राबवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर बाबी बाबत अवगत केले आहे.

Advertisement