राहुल कांबळे, नवी मुंबई
खारघर पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात क्रूर वागणूक, विश्वासघात आणि धमकावणीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार १४ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आली असून, संबंधित घटना जुलै २०१९ ते मार्च २०२५ या कालावधीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे प्रकरण केवळ कौटुंबिक अत्याचारापुरता मर्यादित नसून यात लाखोंची रक्कम व सोन्याचे दागिने हडप केल्याचे आरोप आहेत.
नवी मुंबई खारघर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिलेला तिच्या विवाहाच्या वेळी तिच्या आई-वडिलांनी दिलेले सहा तोळे सोनं आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. याशिवाय ३ लाख रुपयांची रक्कम देखील आरोपींनी घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे."
(नक्की वाचा- Shivsene News : "शिवसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही", शिंदे गटाच्या बड्या नेत्याची उघड नाराजी)
तक्रारीनुसार, आर्थिक शोषण यानंतरही थांबले नाही. पीडितेच्या आईने घर व ऑफिस घेण्यासाठी तब्बल ८४ लाखांची रक्कम आरोपींना दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली. जेव्हा ही मागणी पूर्ण झाली नाही, तेव्हा पीडितेवर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
(नक्की वाचा : Jayant Patil : 'हीच योग्य वेळ आहे...' जयंत पाटील स्टेजवरच रडले! राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार ड्रामा)
या प्रकरणी खारघर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८५ (महिलेवर क्रूरतेचा आरोप), ३१६(२) (विश्वासघात), ३५१(३) (गंभीर धमकी) व ३(५) (सामूहिक हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तक्रारीतील आरोपींमध्ये पीडितेचा ३५ वर्षीय पती, ६० वर्षांची सासू आणि ७२ वर्षांचे सासरे यांचा समावेश असून, हे तिघेही अंबाला, हरियाणा येथील रहिवासी आहेत.
खारघर पोलrस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, आर्थिक फसवणूक व कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप असल्यामुळे पुढील कारवाईला वेग दिला जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.