मोसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Video : छत्रपती संभाजीनगरमधील उल्कानगरी परिसरात बुधवारी मध्यरात्री एका प्राण्याच्या व्हायरल व्हिडीओनं नागरिकांच्या झोपा उडवल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक प्राणी परिसरात वावरताना दिसला आणि बघता बघता संपूर्ण शहरात 'बिबट्या आला' ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही महिन्यांपूर्वीच याच भागात बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. त्यावेळीही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. परंतु, नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि बघता बघता अफवांना पेव फुटले.
वन विभागाची धावपळ आणि तज्ज्ञांचा फौजफाटा
हा व्हिडीओ व्हायरल होताच वन विभागाने तातडीने सूत्रे हलवली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वन्यजीव तज्ज्ञांसह पथकाने थेट घटनास्थळी धाव घेतली.रात्रीच्या अंधारात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा तो प्राणी नक्की कोण? तो बिबट्याच होता का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वन विभागाने तांत्रिक तपासणी सुरू केली. परिसरातील सिमेंटचा रस्ता असल्याने पाऊलखुणा पडताळणी करणे शक्य नव्हते. पण तज्ज्ञांनी व्हिडिओचे निरीक्षण करत हा बिबट्या नसल्याचे स्पष्ट केलं.