संजय तिवारी, नागपूर
अति घाई संकटात नेई, असं म्हटलं जातं. मात्र गोंदिया रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला असात काहीसा अनुभव आला. धावत्या ट्रेनमध्ये उतरताना पाय घसरल्याने प्रवासी प्लटफॉर्मवर पडला. मात्र रेल्वे मदतीसाठी धावल्याने प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. काळजाचा ठोका चुकवणारा हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हावरा साई नगर शिर्डी एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून प्रदीप सिन्हा हे प्रवास करत होते. ट्रेनच्या खिडक्यांवर लागलेल्या पडद्यांमुळे प्रदीप यांना गोंदिया स्थानक आले हे कळालेच नाही. आपल्याला जिथे उतरायचं आहे, ते स्टेशन आलं आहे याची जाणीव प्रदीप यांना उशीरा झाली. गोंदिया स्टेशनवर ट्रेन 3 मिनिटे थांबून पुन्हा सुरु झाली.
मात्र ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रदीप यांनी धावत्या ट्रेनमधीन उडी घेतली. मात्र पाय घसरल्याने प्रवासी प्रदीप तोंडावर आपटले. दरम्यान ट्रेन आणि फलाटाच्या गॅपमध्ये जाणार तोच रेल्वे स्टेशनवर तैनात असलेले पोलीस त्यांच्या मदतीला धावले.
रेल्वे स्टेशनवर असलेल्या 3 रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना बाहेर ओढले. अशाप्रकारे प्रदीप यांचा जीव थोडक्यात वाचला. आरपीएफ जवान जया उईके, हेड कॉन्स्टेबल एम के वाघ आणि सब इन्स्पेक्टर अजय चौबे यांनी हे धाडस दाखवून प्रवाशाला वाचवले. याबाबत तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.