मुंबई रेल्वे विभागाने तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांवर आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी दंडाची रक्कम 20 वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. 2023-24 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने 20.56 लाख प्रकरणांसाठी दंड वसुली केली होती. तिकिटाशिवाय प्रवास करणे, बेकायदेशीररित्या प्रवास करणे, तिकिटाशिवाय मालवाहतूक करणे अशा विविध प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 2023-2024 मध्ये 115 कोटी रुपयांची रक्कम दंडाच्या स्वरुपात गोळा करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने याच कालावधीमध्ये 9.62 लाख प्रकरणांमध्ये कारवाई करत 46 कोटी रुपये दंडाच्या स्वरुपात गोळा केले आहे.
वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांनी 9 सप्टेंबर रोजी एक पत्र लिहिले आहे. मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक (प्रवासी सेवा) यांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रामध्ये त्यांनी विनंती केली आहे की दंडाची रक्कम वाढवण्यात यावी. 2004 नंतर एकदाही दंडाच्या रकमेत बदल करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2004 साली दंडाची रक्कम 50 रुपयांवरून 250 रुपये इतकी करण्यात आली होती. मध्य रेल्वेने त्यांच्या सेवेमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहे.
(नक्की वाचा - घड्याळाचे काटे फिरणार? अजित पवारांना नवीन चिन्हावर निवडणूक लढावावी लागण्याची शक्यता)
प्लॅटफॉर्मची देखभाल करणे, वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एसी लोकल ट्रेन सारख्या उत्तम सोयीसुविधा असलेल्या नव्या ट्रेन सुरू करणे अशा सुधारणा मध्य रेल्वेने केल्या आहेत. मात्र या सुधारणांच्या तुलनेत दंडाची रक्कम ही नगण्य आहे. या उत्तम दर्जाच्या सेवांचा कायदेशीररित्या तिकीट काढून लाभ घेणाऱ्या प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे मनस्ताप होत असतो. याला जरब बसावी हा देखील दंडाची रक्कम वाढवण्यामागे विचार असल्याचे बोलले जात आहे. मध्य रेल्वेने दावा केला आहे की, तिकीटविना प्रवास करणाऱ्या आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यामुळे तिकीटधारक प्रवाशांना होणारा त्रास काही अंशी कमी होऊ शकेल.
(नक्की वाचा- Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक)
सेकंड क्लासच्या तिकिटावर फर्स्ट क्लासमधून प्रवास, टीसीवर प्रवाशाचा हल्ला
फर्स्ट क्लासच्या डब्यातून सेकंड क्लासच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने टीसीवर हल्ला केल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. विजय पंडित (29 वर्षे) यांनी विरार स्टेशनमध्ये उतरलेल्या एका प्रवाशाला तिकीट विचारले. त्याच्याकडे सेकंड क्लासचे तिकीट होते. पंडित यांनी या प्रवाशाला दंड भरायला सांगितला. आपल्याकडे दंडाच्या रकमेपेक्षा कमी पैसे असल्याचे सांगितल्यानंतर पंडित यांनी दंडाची रक्कम कमी केली. पंडित यांनी प्रवाशाला दंडाची पावती दिली आणि ते आपल्या कार्यालयाकडे परतू लागले. यावेळी या प्रवाशाने पंडित यांच्यावर हॉकी स्टीकने हल्ला केला. कानावर फटका बसल्याने पंडित हे रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी पंडित यांना रुग्णालयात दाखल केले. आरोपीचे नाव राहुल असल्याचे कळाले आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.