जाहिरात

Pune News: चाकणमधील रोजची वाहतूक कोंडी आता होणार इतिहास जमा? वाचा काय आहे प्रशासनाचा प्लॅन

Pune News: चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.

Pune News: चाकणमधील रोजची वाहतूक कोंडी आता होणार इतिहास जमा? वाचा काय आहे प्रशासनाचा प्लॅन
पुणे:

Pune News: चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग येत्या 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. चाकण एमआयडीसी परिसरातील नाले आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी संबंधित यंत्रणांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका महत्त्वाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

31 ऑगस्टपर्यंत मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर निर्माण होणारी भीषण वाहतूक कोंडी लक्षात घेता, हा मार्ग तातडीने खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. संबंधित रस्ते मालकीच्या यंत्रणांनी निश्चित केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) खड्डे बुजविण्याची कार्यवाही 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. याशिवाय, एचपी चौक ते चाकण या भागाचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करून पुढील 8 दिवसांत तांत्रिक सल्लागारांना माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पावसाच्या पाण्याचा निचरा आणि दीर्घकालीन रस्ता आराखडा

चाकण एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वंकष पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थापनाचा आराखडा (स्टॉर्म वॉटर ड्रेन प्लॅन) तयार केला जाणार आहे. याचसोबत, भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन रस्ता सुधारणा, जंक्शनची रचना, वाहनतळ आणि सौंदर्यीकरण यांचा समावेश असलेला दीर्घकालीन रस्ता सुधारणा आराखडा पुढील 2 महिन्यांत तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष उपाययोजना

परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी संवेदनशील ठिकाणे आणि 'रेड झोन' निश्चित करून तेथे प्राधान्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी पार्किंग आणि नो-पार्किंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल. 

खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता के. एस. भंडारकर, प्रादेशिक अधिकारी अर्चना पाथरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com