जाहिरात
This Article is From May 04, 2024

येत्या 36 तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता, खबरदारीच्या सूचना 

येत्या 36 तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता, खबरदारीच्या सूचना 
मुंबई:

येत्या 36 तासांत भरती वेळी समुद्रात अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा शक्यता आहे. त्याबाबत भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस यांनी इशारा दिला आहे. शनिवार सकाळी 11.30 वाजेपासून ते रविवार रात्री 11.3o वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत योग्य दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये  उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या 36 तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमारांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.  

हेही वाचा - कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं

महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा - बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?

किनारपट्टीवरील मच्छीमारांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. 

हेही वाचा - 'पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या' ओमराजेंचा मतदारांना अजब सल्ला

या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात शिरू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com