जाहिरात
Story ProgressBack

बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?

Read Time: 4 min
बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?
पुणे:

बारामती लोकसभेची यावेळची निवडणूक कधी नव्हे ऐवढी चर्चेत आणि चुरशीची झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. यावेळी ही निवडणूक पवार विरूद्ध पवार अशी आहे. ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी आहे. ही निवडणूक मुलगी विरूद्ध सुन अशी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी लढत यावेळी होत आहे. तसं पाहीलं तर बारामती हा शरद पवारांचा अभेद्य गड राहीला आहे. या मतदार संघावर पवार कुटुंबाचेच वर्चस्व राहीले आहे. काही अपवाद वगळता इथे एकतर्फी लढती आता पर्यंत झाल्या आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे आलटून पालटून या मतदार संघातून लोकसभेत गेले आहेत. यावेळी मात्र बारामतीत चुरस आहे. निकाल हा पवारांच्याच बाजूने लागणार आहे. पण कोणत्या पवारांच्या बाजूने लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


बारामतीत पवार विरुद्ध पवार 

बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हटलं की बारामती असे जणू समिकरण झाले होते. 1984 पासून हा मतदार संघ शरद पवारांच्या ताब्यात राहीला आहे. कधी एस काँग्रेस, तर कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर पवारांनी इथं बाजी मारली आहे. मात्र यावेळची स्थिती वेगळी आहे. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस आता पुतण्या अजित पवारांकडे आहे. शरद पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आहेत. नवा पक्ष, नव्या चिन्हासह ते निवडणुकीला सामोरे जात आहे. पक्ष नवा चिन्ह नवं असलं तरी खेळाडू मात्र जुनाच आहे. मैदानही तेच आहे. अशा स्थितीत त्यांच्या समोर पुतणे अजित पवारांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. शरद पवारांनी आपल्या पक्षाकडून मुलगी सुप्रिया सुळे यांना मैदानात उतरवलं आहे. सुप्रिया सुळेंनी या मतदार संघात सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. चौथ्या वेळी त्या बारामतीच्या रिंगणात आहेत. जानकरांचा अपवाद वगळता सुप्रिया सुळे यांनी या मतदार संघात एकतर्फी विजय मिळवला आहे. पण यावेळची लढाई कठीण मानली जात आहे. कारण त्यांच्या समोर आव्हान आहे ते भावजय असलेल्या सुनेत्रा पवारांचे.  

हेही वाचा - मविआ सरकार पडणार याची अजित पवारांना कल्पना दिली होती, तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

सुनेत्रा पवारांमुळे लढतीत रंगत 

अजित पवारांनी बारामतीच्या मैदानात पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवलं आहे. त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. अजित पवारांनी संपुर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. काही करून विजय मिळवायचाच असा चंग त्यांनी बांधला आहे. ही लढत जरी सुनेत्रा पवारी विरूद्ध सुप्रिया सुळे अशी जरी असली तरी खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. सुनेत्रा पवारांसाठी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली. महायुतीचे सर्वचं बडे नेते त्यांच्या प्रचारासाठी येऊन गेले आहेत. शिवाय सुनेत्रा यांच्या उमेदवारीनंतर नाराज झालेल्या महायुतीच्या नेत्यांची समजूत काढण्यास अजित पवारांना यश आले आहे. हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवाय सुनेत्रा पवार यांना बाहेरची असा उल्लेख शरद पवारांनी केला होता. त्याचे चांगलेच भांडवल करण्यात आले. या शिवाय आता पर्यंत शरद पवारांना, बारामतीच्या मुलाला, बारामतीच्या मुलीला आणि आता सुनेला निवडून द्या अशी हा अजित पवार देत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

हेही वाचा - कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार बदलणार? आणखी एका नेत्याने फॉर्म भरल्याने ट्विस्ट

शरद पवारांचा अभेद्य गड 

शरद पवारांनी विधानसभेची पहिली निवडणूक बारामतीमधून लढवली होती. शिवाय लोकसभेची पहिली निवडणूक ही ते बारामतीतून लढले होते. तेव्हा पासून अगदी आता पर्यंत त्यांनी पराभवाचे तोंड पाहीले नाही. मात्र यावेळी त्यांना मतदार संघात ठाण मांडून बसण्याची वेळ आली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घ्यायची ही त्यांची पद्धत होती. पण आता गणित बदललं आहे. पवारांना लेकीसाठी बारामतीत अडकून पडावं लागलं आहे. जुन्या सहकाऱ्यासंह नव्याची जुळवा जुळव पवार करताना दिसत आहेत. या निवडणुकीत पवारां समो पहिल्यांदाच आव्हान उभं राहीलं आहे. मात्र या लढाईत पवार कुटुंबातले सर्वच जण शरद पवारांच्या मागे खंबिर पणे उभे आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

बारामतीत कोणाची किती ताकद?

बारामती लोकसभेचा विचार करता सहा विधानसभा मतदार संघाचा यात समावेश होता. त्यात भाजपच्या ताब्यात दोन, राष्ट्रवादी अजित पवारांकडे दोन आणि काँग्रेसकडे दोन मतदार संघ आहेत. शरद पवारांच्या हक्काचा असा एकही आमदार सध्या मतदार संघात नाहीत. तसं पाहीलं तर कागदावर अजित पवारांची बाजू ही उजवी दिसत आहे. पण शरद पवार हेही काही कच्चे खेळाडू नाहीत हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

 बारामती लोकसभेची स्थिती 

    
 दौंड विधानसभा मतदारसंघ          राहुल कुल     भाजप 
 इंदापूर विधानसभा मतदारसंघ       दत्ता भरणे      राष्ट्रवादी 
 बारामती विधानसभा मतदारसंघ     अजित पवार    राष्ट्रवादी 
 पुरंदर विधानसभा मतदारसंघ         संजय जगताप   काँग्रेस 
 भोर विधानसभा मतदारसंघ            संग्राम थोपटे      काँग्रेस  
 खडकवासला  मतदारसंघ              भिमराव तापकीर   भाजप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination