प्रतिनिधी, गुरुप्रसाद दळवी
प्रत्येकजण आपल्या परीने देवाची सेवा करीत असतो. आपल्याला जसं आणि जे शक्य होईल त्यापरीने भाविक देवाची सेवा आणि दान करतात. देवावर प्रत्येकाची श्रद्धा असते, या श्रद्धेनुसार प्रत्येक जण देवासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करीत असतात, असं असताना खारेपाटण येथील एका भक्ताने चक्क आपल्या तीन मुलींच्या लग्नासाठी आलेला आहेर देवाच्या चरणी अर्पण करून आगळी वेगळी परमेश्वराची सेवा केली आहे. त्यांच्या या श्रद्धेची सर्वत्र चर्चा होत आहे.
खारेपाटण येथे नाभिक व्यवसाय करणारे अनंत भिकाजी चव्हाण यांची देवावर अमाप श्रद्धा. ते नेहमीच आपल्या परीने देवाची सेवा करीत आले आहेत. मात्र आपण या सेवेत मोठ्या प्रमाणात हात भार लावू शकत नाही याची त्यांना नेहमीच खंत असायची. काही ठिकाणी छोट्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार पैशांच्या कमतरतेमुळे थांबलेला त्यांना अनेक ठिकाणी दिसून आला. फारसे पैसे हातात नाही मात्र तरीही कशाप्रकारे देवाची सेवा करता येईल? याचा विचार ते करीत होते. अपुऱ्या पैशांअभावी रखडलेल्या मंदिरांचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांची पुढाकार घेण्याचं ठरवलं.
नक्की वाचा - गाड्या, बंगले, बँक बॅलन्स... अबब! नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?
आपल्या तिन्ही मुलींच्या लग्नात मिळणारा आहेर अपूर्ण राहिलेली मंदिरं पूर्ण करण्यासाठी देण्याचा चव्हाणांनी निश्चय केला. तिन्ही मुलींच्याच्या लग्नात चव्हाण कुटुंबीयांना चांगला आहेर मिळाला. त्यामुळे प्रत्येक लग्नानंतर मिळालेला आहेर त्यांनी अपूर्ण राहिलेलं मंदिर पूर्ण करण्यासाठी दिला. लग्नात मिळालेला सगळा आहेर देवाच्या चरणी अर्पण केल्याचं स्वत: चव्हाण सांगतात. तिसऱ्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी स्वत:च्या गावातील आदिष्टी मंदिरात आहेर दिला आणि मंदिराचं अपूर्ण राहिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. भरपूर पैसे नसले तरी देवाच्या सेवाची इच्छा चव्हाणांनी अशा प्रकारे पूर्ण करून घेतली. चव्हाणांच्या या पुढाकाराने अपूर्ण राहिलेल्या मंदिरांचं काम पूर्ण होऊ शकेल, यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.