Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रील स्टार विशाल राठोडने 50 लाखांच्या वादातून निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांची गोळी झाडून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह जंगलात गाडला होता, जो 40 दिवसांनी पोलिसांनी शोधून काढला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Reels Star Arrested for Murder: सोशल मीडियाच्या झगमगाटात राहणाऱ्या एका रील स्टारने थंड डोक्याने केलेल्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ सुभराव लोंढे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह गेवराई तांड्यातील जंगलात 8 फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी रील स्टार विशल राठोड आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

वेबसीरीजला लाजवेल असा कट

विशाल राठोडने दीड महिन्यापूर्वीच या हत्येचा कट रचला होता. हत्येचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे. 50 लाख रुपयांच्या व्यवहारातून विशालने प्राध्यापक लोंढे यांची गोळी झाडून हत्या केली. हत्या केल्यानंतर रक्ताने माखलेला मृतदेह गाडीच्या डिकीत टाकून आरोपी शहरात सुमारे 30 किलोमीटर फिरत होते. 8 तास हे मारेकरी मृतदेहासह रस्त्यावर फिरत होते. आधीच जेसीबीने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात आरोपींनी लोंढे यांचा मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

दिशाभूल करण्यासाठी 'स्टेटस'चा वापर

गुन्ह्याचा उलगडा होऊ नये म्हणून आरोपींनी अत्यंत चलाखीने प्राध्यापकांच्या मोबाईलचा वापर केला. त्यांनी लोंढे यांच्या मोबाईलवरून चुकीच्या इंग्रजीत व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले, जेणेकरून ते सुखरूप असून बाहेर कुठे तरी गेले आहेत, असा लोकांचा समज व्हावा. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

(नक्की वाचा : कल्याणमध्ये रात्री फिरताना अलर्ट राहा! 'या परिसरातील नागरिकांच्या घरांवर झाला सुतळी बॉम्ब हल्ला)

'हनी ट्रॅप'चा संशय

या हत्येमागे केवळ पैसाच होता की आणखी काही, याचा तपास पोलीस करत आहेत. 60 वर्षांचे प्राध्यापक लोंढे आणि 24 वर्षांचा विशाल यांची मैत्री एका महिलेच्या माध्यमातून झाली होती. त्यामुळे पोलीस आता 'हनी ट्रॅप'च्या अँगलनेही तपास करत आहेत. या महिलेची 50 लाखांच्या व्यवहारात काय भूमिका होती, हे लवकरच स्पष्ट होईल.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी विशाल राठोडसह त्याचे साथीदार आकाश पवार आणि करण आडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. रीलच्या दुनियेत चमकणाऱ्या विशालचा खरा आणि क्रूर चेहरा समोर आल्याने त्याच्या फॉलोअर्सनाही मोठा धक्का बसला आहे.

हत्येचा घटनाक्रम

  • 3 फेब्रुवारी- विशाल राठोडने गेवराई तांड्यात गुप्तधनाच्या बहाण्याने 8 फुटांचे 2 खोल खड्डे खोदून ठेवले. 
  • 5 फेब्रुवारी- विशालने लोंढे यांना पार्टीच्या बहाण्याने बाहेर नेले. रात्री पार्टीनंतर विशालने त्यांचीच बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. लोंढे यांचा मृतदेह कारच्या डिकीत टाकून विशाल आणि आकाश पवार तब्बल 30 किमी फिरत होते.
  • 6 फेब्रुवारी - पहाटे 6 च्या सुमारास विशालने गेवराई तांड्यातील खड्यात मृतदेह पुरला. सकाळी 11 वाजता पुन्हा जेसीबी चालकाला बोलावून 'पोलीस केस होईल,' अशी भीती दाखवत तो खड्डा बुजवला. 
  • 8 फेब्रुवारी - तपासाची दिशा भरकटवण्यासाठी लोंढे यांचा मोबाइल घेऊन विशाल पुण्याला गेला. तेथे त्याने लोंढे यांच्या मोबाइलवरून  'i m in personal work-20, 25 dont disturb' असे इंग्रजी स्टेटस ठेवले. 
  • 10 मार्च- मृत लोंढे यांचे नातेवाइक बेपत्ता प्रकरणी पोलीस आयुक्त पवार यांना भेटल्याने तपासाला वेग आला. 
  • 14 मार्च - विशाल आणि आकाशने खून केल्याचे तपासात समोर आले. 
  • 15  मार्च- आरोपींनी खून केल्याचे कबूल केले आणि पोलिसांनी गेवराई येथील जंगलात जाऊन कायदेशीर प्रक्रिया करत मृतदेह बाहेर काढला.
Topics mentioned in this article