छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर-रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका रुग्णाला वेळेवर उपचार मिळवण्यासाठी चिखलातून बैलगाडीने प्रवास करावा लागला. मुसळधार पावसात आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी एका मुलाने केलेली धडपड पाहून प्रशासनाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील रुईखेडा येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध रुस्तुम दहातोंडे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. त्यांच्या मुलाने, रामू दहातोंडे यांनी कसलाही विलंब न करता हतनूर येथील डॉक्टर विवेक अकोलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना उपचारासाठी गावात येण्याची विनंती केली.
डॉक्टरांनीही संवेदनशीलतेने तातडीने आपल्या दुचाकीवरून रुईखेडा गावाकडे धाव घेतली. मात्र, हतनूर ते रुईखेडा दरम्यानचा रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाला होता. चिखलाचा अंदाज न आल्याने आणि रस्ता अत्यंत निसरडा झाल्याने डॉक्टरांना दुचाकीने केवळ अर्ध्या वाटेपर्यंतच पोहोचता आले. त्यापुढे दुचाकी नेणे अशक्य झाल्याने डॉक्टर तिथेच अडकले.
(नक्की वाचा- Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)
3 किलोमीटर चिखल तुडवत बैलगाडीने प्रवास
वडिलांची प्रकृती अधिक बिघडत असल्याचे पाहून रामू दहातोंडे यांनी वेळ न गमावता एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी घरातली बैलगाडी तयार केली आणि त्यात आपल्या आजारी वडिलांना बसवले. मुसळधार पाऊस आणि गुडघाभर चिखल सोसत रामू यांनी बैलगाडीतून तब्बल 3 किलोमीटरचा खडतर प्रवास केला.
कशीबशी बैलगाडी चिखलातून ओढत त्यांनी अर्ध्या रस्त्यावर अडकलेल्या डॉक्टरांपर्यंत वडिलांना पोहोचवले. यानंतर डॉ. विवेक अकोलकर यांनी रस्त्यावरच तात्काळ वयोवृद्ध रुस्तुम यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. मुलाच्या या जीवाची कसरत आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वृद्ध रुग्णावर वेळेत उपचार होऊ शकले.
(नक्की वाचा- FDA Action: मुंबईतील प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम'ला FDAने ठोकले टाळे! तपासणीदरम्यान दुकानात काय आढळलं?)
रस्ते मंजूर, मग कामे का रखडली?
या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती समोर आल्यानंतर परिसरातून प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागातील रस्त्यांची कामे कागदोपत्री मंजूर झाली आहेत, मात्र प्रत्यक्षात ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जर रस्ते मंजूर आहेत, तर मग कामे का रखडली आहेत? दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला अशाच नरकयातना भोगाव्या लागतात. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांना केला आहे.