Stray Dog Attack: महाराष्ट्र हादरला! 3 वर्षांच्या सार्थकचा 8 भटक्या कुत्र्यांनी घेतला बळी, शिर केले धडावेगळे

Stray Dog Attack: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुरड्यावर आठ भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करत त्याचे लचके तोडले. आई दिव्यांग असल्याने तिला बाळाचा आक्रोश ऐकू आला नाही. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Chhatrapati Sambhajinagar 8 Stray Dog Attack: आठ कुत्र्यांनी तीन वर्षांच्या मुलाचा घेतला बळी"
NDTV Marathi

- मोसीन शेख, प्रतिनिधी
Stray Dog Attack:  
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही बातमी वाचतानाही तुमच्या काळजाचा थरकाप उडेल आणि डोळ्यांत पाणी येईल अशी एक भयंकर आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खुलताबाद येथे आठ भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने तीन वर्षांच्या एका मुलावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

कुत्र्यांचा हल्ला इतका भीषण की...

मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक पाटील असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे खेळत असताना अचानक आठ भटक्या आणि हिंस्त्र कुत्र्यांनी सार्थकला गाठले. या कुत्र्यांनी त्याच्यावर एवढा भीषण हल्ला केला की, त्यांनी या चिमुरड्याचे अक्षरशः लचके तोडले. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात सार्थकचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील दृश्य अतिशय विचलित करणारी होती. कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे या मुलाचे शिर आणि डावा पाय धडापासून वेगळा झाला होता.

Advertisement

दिव्यांग आईला ऐकू आला नाही आक्रोश

या घटनेतील सर्वात वेदनादायी आणि काळीज पिळवटून टाकणारी बाब म्हणजे सार्थकची आई. जेव्हा ही आठ कुत्री सार्थकचे चावे घेत होती, तेव्हा त्या निष्पाप जीवाने जीवाच्या आकांताने आपल्या आईला नक्कीच हाका मारल्या असतील. त्याने मदतीसाठी टाहो फोडला असेल. पण सार्थकची आई ही दिव्यांग आहे. ऐकता आणि बोलता येत नसल्याने तिला आपल्याच बाळाचा तो शेवटचा आक्रोश ऐकूच आला नाही. आई घरात असतानाच बाहेर तिच्या काळजाच्या तुकड्याचा असा भयंकर अंत झाला.

(नक्की वाचा : Nagpur News: शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळला अन् मृत्यू; नागपुरातील मन सुन्न करणारी घटना)

वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली

मुलगा बराच वेळ झाला तरी आजूबाजूला दिसत नाही, हे लक्षात आल्यावर काही वेळाने सार्थकच्या वडिलांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मुलाचा शोध घेत असताना एका ठिकाणी त्यांना सार्थक छिन्नविछिन्न आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आपल्या तीन वर्षांच्या सार्थकला भयंकर अवस्थेत पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.  या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता किती गंभीर आणि जीवघेणा बनला आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.