मोसीन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या या काळात कौटुंबिक बजेट कोलमडलेले असताना, छत्रपती संभाजीनगरमधील एका सुशिक्षित व्यक्तीने इंधन बचतीचा असा काही 'जुगाड' शोधला आहे, ज्याची चर्चा आता संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. मिटमिटा परिसरात राहणाऱ्या शेख युसूफ ताजोद्दीन यांनी महागाईला उत्तर देण्यासाठी दुचाकी सोडून थेट घोड्याची स्वारी स्वीकारली आहे.
पेट्रोलच्या दरवाढीपुढे झुकण्यापेक्षा 'स्वारी' बदलली
शेख युसूफ ताजोद्दीन (वय 50) हे एका महाविद्यालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. त्यांचे घर आणि कॉलेज यामध्ये सुमारे 15 किलोमीटरचे अंतर आहे. पूर्वी ते हा प्रवास आपल्या दुचाकीने करायचे. पण गेल्या काही काळात पगार स्थिर असूनही पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने त्यांना घर चालवणे कठीण झाले होते. अखेर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपली दुचाकी घराच्या एका कोपऱ्यात उभी केली आणि दिमतीला 'जिगर' नावाचा काठियावाडी घोडा घेतला.
दिवसाला शेकडो रुपयांची बचत
शेख युसूफ यांचा 'जिगर' हा घोडा ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने धावतो. विशेष म्हणजे जिथे दुचाकीसाठी रोज शेकडो रुपयांचे पेट्रोल खर्च करावे लागायचे, तिथे अवघ्या 150 रुपयांच्या चाऱ्यात हा घोडा त्यांना दिवसभर साथ देतो. वर्ष 2019 पासून युसूफ हे घोड्यावरूनच प्रवास करत आहेत. यामुळे त्यांच्या पेट्रोलचा खर्च निम्म्याहून कमी झाला असून, आर्थिक बचतीसह पर्यावरणाचे रक्षणही होत आहे.
(नक्की वाचा : VIDEO: ना गाड्यांचा ताफा, ना कार... CM फडणवीसांची विधानभवनात सिनेस्टाइल एण्ट्री ; सर्वांचीच पळापळ)
शहरात 'जिगर'ची ऐटदार स्वारीशेख युसूफ हे केवळ कामावर जाण्यासाठीच नाही, तर शहरात कुठेही जायचे असल्यास आपल्या 'जिगर'चाच वापर करतात. अगदी सुटीच्या दिवशी फिरायला जायचे असेल तरी त्यांची ही ऐटदार स्वारी रस्त्यावरून धावताना दिसते. "दुचाकीच्या तुलनेत घोडा कधीही परवडतो आणि तो आरोग्यासाठीही उत्तम आहे," असे शेख युसूफ अभिमानाने सांगतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला शेख युसूफ यांनी खूप आधीपासूनच आपल्या कृतीतून प्रतिसाद दिला आहे. वाढत्या किमतींबद्दल केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा त्यांनी शोधलेला हा वेगळा मार्ग आज अनेकांसाठी कुतूहलाचा आणि प्रेरणादायी विषय ठरला आहे.