
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहात अल्पवयीन मुलींच्या छळ प्रकरणी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देताच पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. NDTV मराठीने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला होता.
छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगृहात मुलींना अमानवी व अघोरी वागणूक दिली जात होती. या प्रकरणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. तसेच विद्यादीपची मान्यता रद्द करण्याचेही घोषणा फडणवीस यांनी केली. याप्रकरणी बालगृहातील 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी सिस्टर सुचिता गायकवाड, केअर टेकर अलका साळुंके व सहायक अधीक्षक वेलरी जोसेफना अटक झाली आहे.
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून पळालेल्या मुलींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा.
चित्रा वाघ यांचे अनेक खुलासे
सुधारगृहात मुली एकमेकींच्या जवळ आल्या तर त्यांना समलिंगी किंवा लेस्बियन म्हणून हिणवलं जायचं. काही मुली या पोक्सो केसमधील होत्या, त्यांना थेट वेश्या म्हणून सांगण्यात येत होते. मुलींच्या झोपण्याच्या रुममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. ऐवढचं नाही तर कहर म्हणजे मुलींना कॅमेरासमोर कपडे बदलावे लागत होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी मुलींना मासिक पाळी येत होती त्यावेळी त्यांना सॅनेटरी पॅड दिले जात होते. पण दुसरा पॅड हवा असल्यास पहिला दाखवल्या शिवाय दुसरा दिला जात नव्हता अशी माहिती देखीस चित्रा वाघ यांनी सभागृहाला दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world