Political News: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'महा-ट्विस्ट'! ZP मध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे. फोडाफोडी टाळण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना जिल्ह्याचे राजकारण कमालीचे तापले आहे. महानगरपालिकेवर वर्चस्व गाजवल्यानंतर आता जिल्हा परिषदेवरही भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र, भाजपचा हा अश्वमेध रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाने 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या उक्तीप्रमाणे एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पंचायत समिती निवडणुकीत भाजपने ठाकरेंचे तीन उमेदवार फोडल्याचा आरोप झाला होता. तसाच प्रकार जिल्हा परिषदेत घडू नये, म्हणून दोन्ही शिवसेनेने आपले सदस्य सुरक्षितस्थळी हलवले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटाचे सदस्य एकत्रच सहलीवर रवाना झाले आहेत. ही 'सहल' केवळ फिरण्यासाठी नसून, भाजपला धक्का देण्यासाठी आखलेली एक मोठी खेळी मानली जात आहे. फोडाफोडीचे राजकारण रोखण्यासाठी आणि आपल्या सदस्यांची मोट बांधून ठेवण्यासाठी दोन्ही गटांनी ही रणनीती आखली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  IPL 2026: SRH ला मिळणार नवा कर्णधार? टी20 वर्ल्ड कप गाजवणारा 'धुरंधर' करणार हैदराबादचं नेतृत्व?)

अब्दुल सत्तार आणि भुमरे फॅक्टर

2017 मध्येही भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-काँग्रेसची युती घडवून आणत भाजपला सत्तेच्या उंबरठ्यावरून परत धाडले होते. आता सुद्धा अब्दुल सत्तार यांचा मुलगा आणि खासदार संदिपान भुमरे यांचा पुतण्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे. त्यामुळे भाजपला अध्यक्षपद न जाता शिवसेनेला मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न  केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेनेचा अध्यक्ष बसवण्यासाठी दोन्ही नेते पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचे बोलले जाते.

जिल्हा परिषदेतील आकड्यांचे गणित

जिल्हा परिषदेत सध्या भाजप 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे.  तर दोन्ही शिवसेनेकडे मिळून 21 जागा आहेत. आकड्यांचे गणित पाहता भाजप सर्वात मोठा पक्ष असला, तरी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आणि इतर छोट्या पक्षांची साथ मिळाल्यास भाजपची सत्ता धोक्यात येऊ शकते.

(नक्की वाचा-  'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)

यावेळच्या लढतीत केवळ सत्तेचे समीकरण नाही, तर दोन्ही शिवसेनेसाठी आपली ताकद दाखवण्याची संधी आहे.  दुसरीकडे, भाजपनेही आपली मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. दोन्ही बाजूने ईर्ष्या पेटली असून, जिल्हा परिषदेच्या सत्तेचे गणित पूर्णपणे बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. आता उद्या होणाऱ्या निवडणुकीत नक्की कुणाचा गुलाल उधळला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 

Topics mentioned in this article