यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Strike News Today : पुण्यातील लालमहल येथे आज अखंड मराठा समाज आणि सर्वपक्षीय शिवप्रेमी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन उभारण्यात आले. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बागेश्वर बाबांनी “छत्रपती शिवाजी महाराज थकल्यानंतर त्यांनी राज्य स्वामी समर्थ रामदास यांच्याकडे सोपवले” असे वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.या वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून पुण्यात त्याचे पडसाद उमटले.
बागेश्वर बाबांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार
आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी केली. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही”,“वादग्रस्त वक्तव्य मागे घ्या” अशा घोषणा देत आंदोलकांनी निषेध नोंदवला.आंदोलकांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या इतिहासाबाबत कोणत्याही प्रकारचे चुकीचे किंवा अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही.
नक्की वाचा >> Sambhajinagar: संभाजीनगरच्या लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! परीक्षेला जाताना होत्याचं नव्हतं झालं
बागेश्वर बाबांनी तातडीने माफी मागावी
संबंधित वक्तव्याबाबत बागेश्वर बाबांनी तातडीने माफी मागावी,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला.दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असून विविध संघटना आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला होता.