भोंगळ कारभार कसा करावा हे पुन्हा एकदा सिडकोने दाखवून दिलं आहे. "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या योजनेतील 26,000 घरांची लॉटरी आज म्हणजे 15 फेब्रुवारीला निघणार होती. त्याची अधिकृत घोषणा ही सिडकोने पंधरा दिवस आधीच केली होती. सर्व पात्र अर्जदारांना लॉटरीसाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण ही देण्यात आले होते. त्याबाबत एसएमएस पाठवले गेले होते. अनेकांनी लॉटरीसाठी सुट्टी ही काढली होती. आपल्या स्वप्नातले घर साकार होणार हे स्वप्न घेवून लॉटरीसाठी अनेक जण गेले ही होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. ऐन वेळी अर्जदारांना लॉटरी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. ही लॉटरी पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घराचं स्वप्न डोळ्यात घेवून आलेल्या अर्जदारांचा हिरमोड झाला. त्यानंतर अर्जदारांनी सिडकोच्या नावाने खडे फोडल्याचे दिसून आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडको महामंडळाच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत शनिवार 15 फेब्रुवारी 2025 ला होणार होती. तशी त्याची घोषणा ही करण्यात आली होती. ही सोडत रायगड इस्टेट, फेज 1, भूखंड क्र. 1, सेक्टर-28, तळोजा पंचानंद इथं होणार होती. सकाळी 11.00 वाजता ही सोडत पार पडणार होती. या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर करण्यात येणार असल्याचं ही सांगण्यात आली होती. याची माहिती सिडको प्रशासनाने अर्जदाना मेसेज द्वारे दिली होती. शिवाय कोणत्या लिंकवर ही लॉटरी लाईव्ह पाहाता येईल ती लिंक ही शेअर केली होती. त्यामुळे अनेक अर्जदारांना घर बसल्या लॉटरी पाहाता येणार होती. पण सगळं मुसळकेरात गेलं. लॉटरी तर जाहीर झालीच नाही.उलट ती पुढे ढकलली गेली.
ऐन वेळी लॉटरी रद्द झाल्याने अर्जदारांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. पाच महिने झाले तरी लॉटरी निघत नसल्याने अर्जदार संतप्त झाले आहे. शिवाय त्यांचे पैसेही अडकून पडले आहेत. त्यात घरांच्या किंमतीही वाढवल्या आहेत. त्याचा वेगळाच रोष अर्जदारांमध्ये आहे. शिवाय सिडकोकडून लॉटरी पुढे का ढकलली याचेही कोणते ठोस कारण देण्यात आले नाही. सिडकोने अनेकांना उशिरा मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे अशा अर्जदारांची चांगलीच दमछाकही झाली. सिडकोने केवळ दोन ओळीची सुचना जाहीर केली आहे. त्यात सिडकोच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी सुचना काढली आहे. शिवाय याबाबतचा मेसेजही पाठवण्यात आला आहे. हे सांगताना ही सोडत पुढे का ढकलली याचे कोणतेही कारण सिडकोने दिलेले नाही. अपरिहार्य परिस्थिती मुळे लॉटरी पुढे ढकलत असल्याचे थुकरट कारण देण्यात आले आहे. शिवाय लॉटरीची नवी तारीख कधी आणि कोणती असेल हे ही स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
ट्रेंडिंग बातमी -Maharashtra Politics: ठाकरे गटात भूकंप, केंद्रबिंदू कोकण! सर्वात मोठा शिलेदार फुटला
सिडकोने 12 ऑक्टोबर 2024 ला "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता 26,000 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. अर्जदारांना आपल्या पसंतीच्या 15 सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरे आहेत.
त्याची लॉटरी 15 तारखेला लागणार होती. मात्र आता ती पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे नव्या तारखेकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. त्यांना वाट पाहत राहण्या शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहीलेला नाही. सिडकोच्या भोंगळ कारभाराचा फटका मात्र सर्व सामान्य अर्जदारांना बसत आहे. त्यामुळे सिडको बाबात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. त्याचा पुढचा फटका सिडकोच्या पुढच्या योजनांना बसू शकतो याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान या योजने अंतर्गत 26,000 घरांसाठी जवळपास 22,000 अर्ज दाखल झाले आहेत.